पाणीबाणीची बळी ! पाण्याचा ड्रम अंगावर पडून महिलेचा मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – पाणी आणताना दुचाकी घसरून पाण्याने भरलेला ड्रम अंगावर पडल्याने २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी बीड तालुक्यातील गुंजाळा येथे घडली.

मिनाक्षी रघुनाथ घुगे (वय २८, रा. गुंजाळा, जि. बीड) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असून तीव्र पाणी टंचाईचा सामना मराठवाड्यातील जिल्ह्यांमधील नागरिकांना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना मैलांचा प्रवास करावा लागत आहे. दरम्यान गुंजाळा येथील मिनाक्षी व अनुरथ हे दोघे दुचाकीवर ड्रम ठेवून पाणी भरत होते.

शनिवारी सकाळी शेतातील बोअरमधून पाणी आणत असताना दुचाकी घसरली. त्यावेळी पाण्याचा ड्रम त्यांच्या अंगावर पडला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. तर त्यांचे पतीही जखमी झाले.. त्यांना तात्काळा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. तर पतीवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.