धक्कादायक ! Covid केअर सेंटरमधील महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी; आरोपी Doctor गजाआड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिला सुरक्षीत नसल्याचे समोर आले आहे. कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका 24 वर्षीय महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी करुन अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.26) रात्री नागपूर येथील कोराडी मार्गावरील एका हॉस्पिटलमध्ये घडली आहे. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करुन सहकारी डॉक्टरला अटक केली आहे.

हॉस्पिटलमधील कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका 24 वर्षीय महिला डॉक्टरने मानकापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डॉ. नंदु रहांगडाले (वय-39 रा. ट्रस्ट-ले-आऊट, हिलटॉप, अंबाझरी) याला अटक केली आहे. पीडित 24 वर्षीय महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमध्ये रुजू झाली होती. तेव्हा पासून आरोपीची तिच्यावर वाईट नजर होती.

सोमवारी रात्री पीडित महिला डॉक्टर खोलीत एकटीच होती. त्यावेळी आरोपी खोलीत आला. त्याने महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी केली. महिला डॉक्टरने नकार दिला. यानंतर आरोपीने अश्लील चाळे करुन महिला डॉक्टरवर अत्याचाराचा प्रयत्न केला. पीडित महिलेने त्याला धक्का देऊन तेथून ती बाहेर पळून गेली. तिने थेट मानकापूर पोलीस ठाणे गाठून तिच्या सोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलिसांनी आरोपीला बेडया ठोकल्या आहेत.