इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली १७ लाखांना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील कोथरुड परिसरात राहणाऱ्या महिलेला इन्स्टाग्रामवरील अनोळखी व्यक्तीशी केलेली मैत्री चांगलीच महागात पडली आहे. तिच्या खात्यावर युरो चलन गिफ्ट म्हणून पाठविल्याच्या बहाण्याने भामट्याने तिच्याकडून १७ लाख रुपये उकळले. याप्रकरण कोथरुड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय गुप्ता, आयुब खान, शाहरुख व इतरांवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर ४० वर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी महिला गृहिणी आहे. या महिलेला २ मुले आहेत. तर पती खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांच्या इन्स्टाग्रामवरील खात्यावरून त्यांची अलेक्स वेल्स नावाच्या एका व्यक्तीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यावेळी त्यांना त्याने २५ हजार युरो चलनाचे गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. त्यांचाही विश्वास बसला. ते मिळविण्यासाठी त्याने वेगवेगळी कारणे सांगून महिलेला पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी १७ लाख ११ हजार रुपये उकळले. मात्र कोणतीही भेट किंवा रक्कम न मिळाल्ये तिने पोलिसांत धाव घेतली.विशेष म्हणजे ते पैसे मिळविण्यासाठी महिलेने आपल्या खात्यातील एफडी व स्वत:चे दागिनेही विकल्याचे समोर आले आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास खटके करत आहेत.