पुण्यातील कोथरूडमध्ये ‘ट्रॅफिक’ जॅम, आईनं रिक्षातच दिला बाळाला जन्म

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही अनेकदा चित्रपटात पाहिलं असेल की रुग्णवाहिका रस्त्यात वाहतूक कोंडीत अडकते आणि गर्भवती महिला आपल्या बाळाला रुग्णालयात जाण्याआधीच जन्म देते. असाच प्रकार पुणे शहरात घडला. इथं रुग्णवाहिकेऐवजी फक्त रिक्षा होती एवढचं. झालं असं की शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास प्रसुती वेदना सुरु झाल्यामुळे भूगाववरुन रिक्षाने महिला पुण्यातील दवाखान्यात निघाली, तिच्यासोबत तिचे कुटूंबीय देखील होते. परंतू मोठी वाहतूक कोंडी होती. गाडी पुढे सरकत नव्हती. रिक्षातून उतरुन एकाने वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतू उपयोग झाला नाही. वाहनांची कर्कश हॉर्न, धूर आणि मुलीला बाळंतपणासाठी घेऊन जाणारी आई असे चित्र होते.

त्यामुळे मुलीला दवाखान्यात कसे न्यायचे हा प्रश्न आईला पडला होता. परंतू वाहतूक कोंडी मोठी होती. आईला आपली मुलगी आणि बाळ दोन्ही सुखरुप हवे होते. त्यामुळे रिक्षा रस्त्याच्या बाजूला लावून स्वत:चे पारंपारिक ज्ञान वापरत मुलीला धीर देत मुलीचे बाळंतपण आईने रिक्षातच केले. त्यानंतर कोथरुडला मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, आता औषधोपच्चार सुरु आहेत आणि दोघे सुखरुप आहेत.

सचिन धनकुडे यांनी सांगितले की ग्रामीण भागात वाहनांची आणि रस्त्यांची सोय नाही म्हणून रुग्णांना दवाखान्यता नेणे अडचणीचे होते, परंतू शहरात मात्र वाहतूक कोंडी सोडवता येत नाही म्हणून रुग्ण दगावतात. या दोन्ही बाबी नियोजनातील अपयशाचे दर्शक आहेत. विकसित असताना वंचित राहावं लागणं हे दुर्दैव आहे. राज्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांनी आणि जनतेने आत्मपरिक्षण करावं.

प्रा. सागर शेडगे म्हणाले की, भूगावत असणारी मंगलकार्यालये, बावधान हद्दीत असलेली वींड मील सोसायटीच्या याबाजूने येणारी जाणारी वाहने, रस्त्याच्या बाजूला असलेल्या दारुच्या दुकानाबाहेर लागलेल्या गाड्या यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सुट्टीच्या दिवशी या भागात मोठी वाहतूक कोंडी असते. वाहतूक पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याचा दृष्टीने उपाययोजना कराव्यात.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/