खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलमध्ये महिलेने दिला ५.०५ किलो वजनाच्या मुलीला जन्म  

पुणेः पाेलीसनामा ऑनलाईन- पुण्यातील ३० वर्षांच्या श्रीमती गरिमा श्रीवास्तव यांनी खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलमध्ये ५.०५ किलो वजनाच्या मुलीला जन्म दिला. जन्मतःच सामान्य वजनापेक्षा अधिक वजन असलेल्या बाळाची प्रसूती सिझेरिअन शस्त्रक्रियेने झाली. सामान्यपणे आढळणाऱ्या वजनापेक्षा अधिक वजनाच्या बाळाचा जन्म होणे हे भारतात दुर्मीळ असते. अशा मोठ्या बाळांना मॅक्रोसॉमिक बाळे म्हणतात. सामान्य बाळाचे वजन हे साधारण ३ किलो असते.

श्रीमती गरिमा श्रीवास्तव आपल्या गर्भावस्थेत नियमितपणे वैद्यकीय तपासणी करून घेत असत. त्यांनी गरोदरपणाचे नऊ महिने पूर्ण केले आणि त्यांना मदरहूड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची रक्तशर्करा आणि इतर पूर्वचाचण्यांचे निष्कर्ष सामान्य होते आणि प्रसूतीपूर्वी त्यांचे वजन १०५ किलो होते. ही एक काळजीची बाब होती आणि पुढील व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक आव्हान होते. त्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या स्कॅनमध्ये त्यांना पॉलिहायड्राम्निऑस असल्याचे दिसून आले.

या परिस्थितीत गर्भाशयातील बाळाभोवती अॅम्निऑटिक द्रव जास्त असते आणि बाळाचे वजन ३ किलो असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. गर्भाशयातील बाळाला आधार देणे आणि बाळाचे हात-पाय, फुफ्फुसे आणि पचनक्रिया करणाऱ्या अवयवांचा विकास करणे हे या द्रवाचे उद्दिष्ट असते. या द्रवामुळे बाळाला उशी मिळते आणि सम, सुयोग्य शारीरिक तापमान राखण्यास मदत होते.

पुण्यातील मदरहूड हॉस्पिटलमधील सल्लागार प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मोहिता गोयल म्हणतात, “सी-सेक्शन प्रसूती शस्त्रक्रिया करताना बाळाचे डोके बाहेरील बाजूस वाकलेले होते आणि गर्भाशयातील पोकळीमध्ये तरंगत होते. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमधील प्रत्येकालाच आश्चर्य वाटले होते. परिणामी बाळ बाहेर काढणे काहीसे कठीण होते. ही गुंतागुंतीची परिस्थिती होती. पण आता आई आणि बाळाची प्रकृती शस्त्रक्रियेनंतर समान्य आहे. मधुमेह नसलेल्या महिलेला प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेले बाळ होणे, ही खूपच दुर्मीळ केस आहे.

पुण्यातील मदरहूड हॉस्पिटलमधून प्रमुख निओनॅटोलॉजिस्ट डॉ. तुषार पारिख म्हणाले, “अशा जास्त वजन असलेल्या बाळांना मॅक्रोसॉमिक बाळे म्हणतात. त्यांच्या शरीरातील ग्लुकोजची मागणी जास्त असल्यामुळे त्यांना हायपोग्लायसेमिया (रक्तशर्करा कमी होणे) होण्याचा धोका असतो. त्यामुळे असा बाळांच्या रक्तशर्करेच्या पातळीवर लक्ष ठेवण्यात येते. सामान्यतः मोठी बाळे होणे हा कौटुंबिक गुणधर्मच असतो.”

“अशा बाळांच्या हाडांना किंवा नसांना काही वेळा इजा झालेली आढळते, कारण अशा बाळांची प्रसूती करणे हे एक आव्हानच असते. काही बाळे प्रसूतीदरम्यान अडकतात आणि प्रसूतीला विलंब लागला तर त्यांना अॅस्फिक्सियाचा (मेंदूमध्ये ऑक्सिजनची आणि पोषक तत्वांची कमतरता भासणे) त्रास होतो. या बाळाची सुरक्षित प्रसूती करून मदरहूड हॉस्पिटलमधील आमच्या टीमने उत्तम कामगिरी बजावली! सामान्य वजन असलेल्या बाळाचे चौथ्या-पाचव्या महिन्यात वजन ५ किलो होते.”, अशी पुष्टी डॉ. पारीख यांनी जोडली.

ते पुढे म्हणाले, “काही मॅक्रोसॉमिक बाळांना श्वास घेण्यासाटी त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत जन्मानंतर ऑक्सिजन अथवा श्वासोच्छवासासाठी आधार द्यावा लागतो. अशी बहुतांश बाळांचे शरीर त्यांच्या पुढील आयुष्यातदेखील मोठेच राहते.

अत्यंत आनंदात असलेल्या या नवजात कन्येच्या माता श्रीमती गरिमा श्रीवास्तव म्हणाल्या, “माझ्या बाळाला कुशीत घेऊन मला अत्यंत आनंद झाला. मदरहूड हॉस्पिटलमधील डॉ. मोहिता गोयल आणि त्यांच्या टीमची अत्यंत आभारी आहे. त्यांच्यामुळेच, कोणतीही गुंतागुंत न होता बाळ बाहेर येऊ शकले.

“सामान्यतः नवजात बालकाचे वजन २.५-३ किलो असतेतर या नवजात मुलीचे वजन ४-५ महिन्यांच्या बाळाएवढे आहे”असे डॉ. मोहिता गोयल म्हणाल्या