प्रेमामध्ये अडथळा बनत होती पोलिस असलेली आई, मुलीनं कायमचं संपवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रेमात वेड्या झालेल्या मुलीने आपल्या पोलीस आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई आपल्या प्रेमात अडथळा निर्माण करत असल्याच्या कारणावरून मुलीने जन्मदात्या आईचा खून केला. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील अल्पवयीन मुलीने हे कृत्य केले आहे. मृत शशि शुक्ला दिल्ली येथील बृज विहार पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या.

शशि शुक्ला यांच्या मुलीचे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. या प्रकरणाची माहिती मुलीच्या आईला झाल्यानंतर तिने मुलीला समजावून सांगत मुलापासून दूर राहण्यास सांगितले. मात्र, मुलीला हे पसंत नसल्याने तिने आईला संपवण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांना देखील धक्का बसला.

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. तपासादरम्यान पोलिसांना मुलीवर संशय आल्याने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिचे एका मुलावर प्रेम होते. प्रेमप्रकरण आईला समजल्यानंतर तिने मुलापासून दूर हारण्यास सांगत होती. ती आपल्या प्रेमात अडथळा निर्माण करत असल्याने तिला संपवण्याचा कट रचला. यासाठी प्रियकराची मदत घेतले. अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आईचा खून केला. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून अल्पवयीन मुलीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.