UP : धक्कादायक ! ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी कारवाई केलेल्या तरुणीचा गर्भपात

पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद (Love Jihad) कायद्यांतर्गत कारवाई केलेल्या 22 वर्षीय तरुणीने वैद्यकीय निष्काळजीपणामुळे आपला गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तरुणीच्या पतीला ‘लव्ह जिहाद’ कायद्यांतर्गत अटक केली होती. यानंतर तिला नारी निकेतन शेल्टर होममध्ये पाठवले होते. नारी निकेतनमध्ये आपला छळ झाल्याचा आरोप तरूणीने केला आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना तरुणी म्हणाली की, मी पाच ते सहा दिवसांसाठी नारी निकेतनमध्ये होते. यावेळी माझ्या पोटात दुखू लागले होते. त्यांनी माझ्या पोटदुखीकडे दुर्लक्ष केल आणि नंतर जेव्हा माझी परिस्थिती सुधारत नव्हती तेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे डॉक्टरांनी मला इंजेक्शन आणि औषध दिली ज्यामुळे गर्भपात झाला, असा आरोप तरुणीने केला आहे. डॉक्टरांना माझा गर्भपात झाल्याची माहिती होती. अल्ट्रासाऊंड चेक अपदेखील केला होता. सुरुवातील त्यांनी बाळ सुखरुप असल्याच सांगितले. यानंतर त्यांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे माझी प्रकृती अजून बिघडली. रक्तस्त्राव सुरु झाला आणि प्रकृतीत अजून बिघाड झाला, असे तरुणीने म्हटले आहे.

तरुणीच्या आरोपांवर जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी प्रतिक्रिया दिली आहे. वेदना आणि रक्तस्त्राव रोखण्यासाठीच तिला गोळ्या दिल्या होत्या. अल्ट्रासाऊंडमध्ये अर्भक दिसत होते, पण ह्रदयाचे ठोके ऐकू येत नव्हते. यानंतर तिला मेरठमधील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. पण तिच्या नातेवाईकांना खासगी गाडीतून न्यायच होते. सर्व आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी डिसेंबर महिन्यात मुरादाबाद येथून तरुणीचा पती आणि त्याच्या भावाला धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत अटक केली होती. राशीद असे तरुणीच्या पतीचे नाव आहे. तरुणीने प्रशासनाकडे पती आणि त्याच्या भावाच्या सुटकेची मागणी केली आहे.