Coronavirus : ‘कोरोना’चा केरळमध्ये पहिला बळी, दुबईवरून आलेल्या महिलेचा मृत्यू, राज्यातील 110299 लोक निरीक्षणाखाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोना ग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. असे असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केरळ मध्ये कोरोनामुळे पहिल्यांदाच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही एक महिला आहे. दुबईहून प्रवास करून ही महिला भारतात परतली होती. ६९ वर्षीय ही महिला एर्नाकुलम मेडिकल कॉलेज मध्ये उपचार घेत होती. मिळालेल्या माहितीनुसार न्यूमोनिया झाल्याचे निदान झाल्यानंतर तिला दवाखाण्यात दाखल करण्यात आले होते. या महिलेला हाय बीपी आणि तीव्र हृदयविकाराचीही तक्रार होती. शनिवारी सकाळी आठ वाजता या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शुक्रवारी सांगितले की , राज्यात शुक्रवारी ३९ लोकांना कोरोनाची लागण झाली. त्याचबरोबर राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एकूण १६४ झाली आहे. ते म्हणाले की, ३९ नवीन प्रकरणांपैकी ३४ सर्वात जास्त कासारगोड जिल्ह्यातील आहेत. ते म्हणाले की, कन्नूर जिल्ह्यातून दोन आणि त्रिशूर, कोल्लम आणि कोझिकोड जिल्ह्यातून प्रत्येकी एक नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, एकूण १,१०,२९९ लोकांना निरीक्षणाखाली ठेवले गेले आहे तर ६१६ लोकांना विविध रुग्णालयांच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल केले आहे.