केरळच्या इतिहासात प्रथमच महिला पत्रकार बनणार कॅबिनेट मंत्री

केरळ : पोलीसनामा ऑनलाइन –  सहा एप्रिलला झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ एलडीएफने १४० पैकी ९९ जागांवर विजय मिळवून सत्ता राखली आहे. त्यानंतर उरला प्रश्न तो मंत्रिमंडळ विस्ताराचा. कोणाला कोणते खाते मिळणार, कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोमवारी मुख्यमंत्री पी. विजयन यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यावेळी एक इतिहास घडला असून प्रथमच एक महिला पत्रकार मंत्री बनणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्या वीणा जॉर्ज असं त्यांच नाव आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

मल्याळम भाषेतल्या अनेक वृत्त वाहिन्यांमध्ये पत्रकार आणि न्यूज अँकर म्हणून वीणा जॉर्ज यांनी काम केलं आहे. वीणा जॉर्ज यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात २०१६ च्या विधानसभा निवडणुकीपासून सुरु झाली. या निवडणुकीत अरनमुला मतदारसंघातून उमेदवारी घेत काँग्रेस नेते शिवदासन नायर यांना सात हजार ६४६ मतांनी हरवलं होतं. काँग्रेसकडून हा मतदार संघ त्यांनी खेचून घेतला. त्यानंतर यावर्षी पठान मथिट्टा जिल्ह्याच्या मतदारसंघातून वीणा यांनी तब्बल १९ हजार मतांधिक्याने विजय प्राप्त केला.

वीणा जॉर्ज या ४५ वर्षाच्या असून त्यांना दोन मुलं आहेत. भौतिक विज्ञानात एमएस्सीचं शिक्षण घेतलेल्या जॉर्ज यांनी बीएडमध्ये वरचा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. वीणा जॉर्ज यांचे पती डॉ. जॉर्ज जोसेफ हे एक उच्च माध्यमिक शिक्षक असून, मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्चचे सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केलं आहे. वीणा जॉर्ज यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी शाखा असलेल्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यकर्त्या म्हणून केली होती.

पिनरई विजयन यांच्या मंत्रिमंडळात वीणा जॉर्ज यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन महिलाही असतील. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यवाहक सचिव ए.विजय राघवन यांच्या पत्नी प्रा. आर. बिंदू यांची पक्षाने मंत्रिमंडळात निवड केली आहे. तसंच,चादयमंगलम मतदारसंघातून निवडून आलेल्या ज्येष्ठ नेत्या जे. चिंचूरानी यांचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मंत्रिमंडळात निवडीसाठी नामनिर्देशन केलं आहे. मंत्री म्हणून एखाद्या महिलेला संधी देण्याची भारतीय कम्युनिस्ट पक्षाची ही पहिलीच वेळ आहे.