पुण्यात दारूड्या पतीची पत्नीकडून हत्या, अंगणातच जाळला मृतदेह

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – दारूड्या पतीच्या व्यवसनाचा त्रास सहन न झाल्याने पुण्यात एका महिलेने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या महिलेने साडीने पतीचा गळा आवळून त्याची हत्या केली. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो अंगणात जाळून टाकला. शिवाय या हत्येचा संशय तिने मुलांवर व्यक्त केला. मात्र पोलिसांनी तपास केला असता या महिलेनेच खून केल्याचे उघड झाले. विद्या कांबळे असे या महिलेचे नाव आहे.

विद्या कांबळे यांच्या पतीला दारूचे व्यसन जडले होते. तो दररोज दारू पिऊन घरात गोंधळ घालत असे. रोजच्या भांडणामुळे त्या त्रासल्या होत्या. अखेर या त्रासातून मुक्त होण्यासाठी या महिलेने पतीचा खून करण्याचा निर्णय घेतला. साडीने गळा दाबून विद्या कांबळे यांनी पतीची हत्या केली. विशेष म्हणजे हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये यासाठी त्यांनी थेट मुलांवरच हत्येचा आरोप केला. जेवण वाढण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून मुलांनी ढकलल्याने पतीचा मृत्यू झाल्याचा खोटा बनाव त्यांनी केला. शिवाय पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने विद्या कांबळे यांनी अंगणातच पतीचा मृतदेह जाळून टाकला. निलेश कांबळे यांच्या भावाने पोलिसांकडे तक्रार करत संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपास करून विद्या कांबळे यांना अटक केली.