ठाण्यामध्ये बेस्टच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू: पती गंभीर

पोलीसनामा ऑनलाईन, ठाणे, 8 डिसेंबर : तीन हात नाका ते मुलूंडच्या दिशेने जाणार्‍या ठाणे ते सायन या बेस्ट बसच्या धडकेने दुचाकीवरून जाणार्‍या प्रतिक्षा परब (35) या विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडलीय. या अपघातात तिचे पती प्रमोद शाम (40, रा. लोकमान्यनगर, ठाणे) हे गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी बसचालक अनिल पवार (45) यांना ताब्यात घेतल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिलीय.

ठाणे- मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावरील तीन हात नाका ते मुलूंडच्या दिशेने प्रमोद आणि प्रतिक्षा हे पती पत्नी त्यांच्या दुचाकीवरून जात होते. पती प्रमोद हे दुचाकी चालवत होते. तर त्यांची पत्नी प्रतिक्षा पाठीमागे बसलेली होती. त्याच मार्गावरुन जाणार्‍या खोपट ते सायन या बेस्ट बसने त्यांना जोरात धडक दिली.

या धडकेमुळे दुचाकीवरून दोघेही खाली कोसळले. तर, प्रतिक्षा खाली पडल्यानंतर तिच्या अंगावरुन बसचे चाक गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. प्रमोद यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यांना एका खासगी वाहनातून नजीकच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

बेस्टची बस व दुचाकी ही दोन्ही अपघातग्रस्त वाहने नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलीय. या अपघातानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात स्वत: हजर झालेले बेस्टचे चालक पवार यांना ताब्यात घेतले आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दुचाकीवरील ही महिला बसच्या मागील चाकाखाली कशी आली? याबाबत काहीच माहिती नसल्याचे पवार याने चौकशीत पोलिसांना सांगितले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे अधिक तपास करीत आहेत.