Pune News : ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक पोटावरून गेल्याने महिला ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   दौंड येथे एक धक्कादायक घटना घडली. ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक पोटावरून गेल्याने महिला ठार झाली. याबाबत ट्रॅक्टर चालक दिपक बबन मोरे (रा. कानगाव, ता. दौंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता सुरेश काळे (वय ४२, रा. वाघजाई खंडोबा मळा, जय भवानी सुपर मार्केट, मांजरी खुर्द, ता. हवेली) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर दौंड शहरात गजानन सोसायटी ते राजधानी हॉटेल दरम्यानच्या रस्त्यावर रविवारी (दि. २८) पावणेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक पळून जाण्याचा प्रयत्नात होता. मात्र, त्यास पकडून पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी मयत महिलेचे पती सुरेश काळे (वय ४८) यांनी फिर्याद दिल्याची माहिती सहाय्यक फौजदार दिलीप भाकरे यांनी दिली.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश काळे आणि त्यांची त्यांची पत्नी कविता हे दुचाकीने मांजरीहून नातेवाईकाच्या लग्नासाठी दौंडमध्ये आले होते. येथील विठ्ठल मंदिर याठिकाणी लग्नाचा कार्यक्रम उरकून पुन्हा मांजरीला जाण्यासाठी निघाले होते. कुरकुंभ मोरीतून पुढे गोलराऊंडमार्गे राजधानी हॉटेल समोरील रस्त्यावर ट्रॅक्टरने या दुचाकीला एका बाजुला दाबले. यादरम्यान ट्रॉलीचा धक्का लागून दुचाकी व त्यावरील पती व पत्नी खाली पडले. यामध्ये ट्रॅक्टरच्या रिकाम्या ट्रॉलीचे चाक कविता यांच्या पोटावरून गेल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना दौंड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले; मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील लोंढे करत आहे.