खळबळजनक ! दगडानं ठेचून महिलेचा निर्घृण खून, नग्नावस्थेत मृतदेह आढळला

हैदराबाद : वृत्तसंस्था – एका महिलेचा दगडाने ठेचून आणि हात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न आणि नग्नावस्थेत आढळून आला आहे. अज्ञात आरोपींनी महिलेचा खून करून ओळख पटू नये यासाठी तिचा चेहरा दगडाने ठेचला आहे. महिलेचा मृतदेह शहराजवळील चेवल्ला परिसरातील एका पुलाखाली सकाळी सातच्या सुमारास आढळून आला आहे. या महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर महिलेवर बलात्कार झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मृत महिलेचा चेहरा अतिशय वाईट पद्धतीने दगडाने ठेचल्याने तिची ओळख पटवणे अवघड झाले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. महिलेच्या शरिरावर सिजर केल्याचे निशाण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मृत महिलेच्या अंगावरील दागिने तसेच आहेत. सोनसाखळी आणि सोन्याची अंगठी तिच्या अंगावर आहे. तर तिच्या मृतदेहाजवळ सोन्याच्या बांगड्या आढळून आल्या. पोलिसांनी तपास सुरु केला असून फॉरेन्सिकच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केल्याचे पोलिसाकडून सांगण्यात येत आहे. या महिलेचा मृतदेह सकाळी प्रत:विधीसाठी गेलेल्या एका ग्रामस्थाला दिसला. यानंतर चेवल्ला परिसरात एकच खळबळ उडाली.

महिलेचा चेहरा दगडाने ठेचल्याने ओळख पटवणे अवघड झाले आहे. त्यामुळे महिलेची ओळख पटवण्यासाठी हैदराबाद शहर आणि हैदराबाद लगतच्या जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांकडून जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. महिलेचे वय साधारण 25 ते 30 दरम्यान असल्याचे शमशाबादचे पोलीस आयुक्त एन प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.