राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी शरद पवार आणि ‘या’ दिग्गज महिला नेत्याचं नाव ‘फायनल’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभेत महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्च 2020 ला निवडणूक होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील इच्छूकांची रस्सीखेच सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी दोघांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि फैजिया खान यांची नावे आज निश्चित करण्यात आली आहेत.
राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान यांची नावं निश्चित झाली आहेत. राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी होणार निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात, चार पैकी दोन जागा राष्ट्रवादीला आणि एक शिवसेना, एक जागा काँग्रेसला मिळणार आहे.
संसदेचे स्थायी सभागृह असणाऱ्या राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये 2, 9, आणि 12 एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील सात सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 रोजी संपत आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, ॲड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे या सात जणांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आहे.