प्रियकरासाठी करवाचौथचं व्रत ठेवणं पडलं महागात, कुटुंबीयांनी चांगलच चोपलं

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाइन –  आश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी करावाचौथ हे व्रत करतात. पण लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने करवाचौथ केल्यामुळे कुटूंबीयांनी तिला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार लखनऊमध्ये उघडकीस आला आहे. त्यानंतर तरुणीने कुटुंबीयांपासून जीव वाचवत पोलीस ठाण्यात धाव घेतली असता नातेवाईकांनी तरुणाला मारहाण करुन तिथे सुद्धा राडा केल्याची माहिती मिळत आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, सदरील तरुणी मागील दोन वर्षांपासून एका तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. करवाचौथ च्या निमित्ताने तिने आपल्या प्रियकरासाठी हे व्रत ठेवलं होत. याबद्दलची माहिती तरुणीच्या कुटूंबीयांना मिळताच त्यांनी जबरदस्तीने घरात घुसून तिला आणि तिच्या प्रियकराला बेदम मारहाण केली. यानंतर या दोघांनी तक्रार दाखल करण्यासाठी अरविंदो पोलीस ठाणे गाठले.

दरम्यान, पोलीस ठाण्यात सुद्धा तरुणीच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत तिला मारहाण केली. याबाबतच एक व्हिडीओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पोलिसांनी कुटूंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. मग पोलिसांनी या प्रकरणी पीडितेच्या भावास ताब्यात घेतले असून त्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.