पुण्यात सिंहगड रोड परिसरातील ‘त्या’ महिलेचा गळा दाबून खून झाल्याचं उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड रोड परिसरात शुक्रवारी रात्री राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडलेल्या त्या महिलेचा गळादाबून खून करण्यात आल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. शवविच्छेदनानंतर हा प्रकार समोर आला असून, त्यानुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मध्यवस्थीत त्याचदरम्यान राहत्या घरात महिलेचा खुनकरून मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे शहरात एकाच दिवशी दोन महिलांचे खूनाचे घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

राणी सुनील चवले (वय 32, रा. रायकरमळा, धायरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिहंगड रोड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी व तिच्या पती हे धायरी परिसरातील रायकर मळा येथे राहत होते. पती सुनील हे इलेक्ट्रिीकचे कामे करतात. तर, राणी या गृहीणी होत्या.

दरम्यान पती सुनील हे काम संपवून रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यावेळी त्यांना पत्नी राणी यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार, सिहंगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह खाली काढून शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविला होता. रात्री उशिर झाल्याने शवविच्छेदन झाले नव्हते. मात्र, शनिवारी शवविच्छेदन करण्यात आले. त्यात राणी यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान पोलिसांनी प्रथम आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. परंतु, अहवालानंतर अज्ञाताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, नेमका खून कोणी आणि का केला, याची माहिती घेतली जात आहे.