पत्नीने रचला पतीच्या खूनाचा कट, तलवारीने वार करीत डोकं केलं धडापासून वेगळं

धनबाद : वृत्तसंस्था – किरकोळ वादातून पत्नीने आपल्या पतीचे तलवारीने डोकं धडावेगळ करुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी पत्नीला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली तलवार पोलिसांनी जप्त केली आहे. पत्नीने पतीचा खून करून पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन पत्नी मालती देवी हिला अटक केली असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

शरीराचे तुकडे करुन फेकले विहिरीत
सीटी एसपी आर राजकुमार यांनी सांगितले की, 29 ऑगस्ट 2020 रोजी चंद्रकांत टुडू याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाला. चंद्राकांत याची पत्नी मालती देवीने 2 ऑगस्ट रोजी आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलीस चंद्रकांचा शोध घेत असताना घराच्या मागे असलेल्या विहिरीमध्ये त्याच्या शरीराचे तीन भाग कापलेल्या अवस्थेत आढळून आले. मृतकाचे धड आणि पायचं मिळाले होते. मृतकाचे डोके सापडले नव्हते. यानंतर या प्रकरणाचा कसून तपास केला असता चंद्रकांच्या पत्नीवर संशय आला. तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.

त्रासातून मुक्त होण्यासाठी पतीचा खून
पोलिसांनी मालती देवी हिच्याकडे केलेल्या चौकशीत मालतीने सांगितले की, पती मुंबईत मजुराचे काम करत होता. यावर्षी जानेवारी महिन्यात तो मुंबईहून परतला होता. त्यामुळे मुलांचा सांभाळ करणं कठीण जात होतं. ती दारूची विक्री करत होती. त्यामुळे तिच्या घरात बरेच लोक येऊ लागले. मात्र, पतीला हे आवडत नसल्याने त्यांच्यात सतत वाद होत होते. याच त्रासातून मुक्त होण्यासाठी तिने पतीच्या खूनाचा कट रचला.

असा केला खून
घटनेदिवशी चंद्रकांत मित्रांसोबत घराच्या अंगणात बसून दारु पित होता. रात्री 9 वाजता तीने मुलांना झोपवून पतीच्या खोलीत गेली. तिने धारदार तलवारीने पतीच्या मानेवर जोरदार वार केला. मान धडापासून वेगळी झाली. त्यानंतर शरीराचे अनेक तुकडे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते तिला शक्य झाले नाही. तिने गुडघ्यावर वार केले, मात्र पाय कापला गेला नाही. त्यानंतर तिने मृतदेहाच्या कमरेवर वार करुन धडाचे दोन तुकडे केले. असे वृत्त एका हिंदी वेवबसाईटने दिले आहे.

मृतदेहाची अशी लावली विल्हेवाट
मालतीने खून केल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास त्याचे धड एका टोपलीत भरले आणि घरामागे असलेल्या विहिरीत फेकून दिले. तलवारही दुसऱ्या दिवशी विहिरीत फेकून दिली. यानंतर तिने घराची साफसफाई केली. दुसऱ्या दिवशी पतीचं डोकं एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून स्कूटीच्या डिक्कीत ठेवून लांब फेकून दिले. पोलिसांना तपासादरम्यान ही स्कूटी सापडली आहे.