कौतुकास्पद ! गर्भावस्थेतही मुंबई पोलीस दलातील रणरागिनींची सेवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबई पोलीस दलातील कोरोनायोद्धे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. गर्भवतींसाठी असलेले नियम फक्त कागदावरच असल्याचे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण गर्भावस्थेत आराम करून डोहाळे पुरवून घेण्याच्या दिवसांत पोलीस दलातील रणरागिणी कुठलीही तक्रार न करता आपली सेवा बजावत आहे. मग त्यांना घरातून बंदोबस्ताचे ठिकाण गाठण्यासाठी तासन‌्तास बस, लोकलसाठी थांबावे लागले तरी चालेल.

गर्भवती महिला पोलिसांना कोरोनाच्या पहिल्या लाटेत घरी राहण्याचे आदेश होते. पण सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई पोलीस दलातील ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले किंवा विविध आजार जडलेल्या पोलिसांना तसेच गर्भवती महिलांना १२ तास सेवा केल्यानंतर २४ तास आराम देण्याच्या सूचना देण्याबरोबरच त्यांना कार्यालयीन कामाची जबाबदारी देण्याचे आदेश दिले. मात्र बऱ्याच ठिकाणी गर्भवतींसाठी हे नियम कागदावरच असल्याचे चित्र आहे.विशेषत: सशस्त्र पोलीस दलातील काही विभागात गर्भवती महिलाही बाहेर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याचे समोर आले आहे. वरिष्ठांनी एक अजब फतवा काढला असून त्यानुसार गर्भावस्थेच्या ५ महिन्यांपर्यंत बाहेर ड्यूटी करायची आहे. त्यानंतर सहाव्या महिन्यानंतर त्यांना कार्यालयीन कामासाठी घेण्यात येणार असल्याचे समजते. १२/ २४ तासांचा फॉर्म्युला येथील गर्भवती महिलांना लागू न केल्यामुळे त्यांना आठवड्यातून एकच सुट्टी मिळत आहे. त्यामुळे नाराजीचा सूर उमटत असून पोलीस ठाणे आणि सशस्त्र विभागात वेगळे नियम कसे, असा सवालही काही गर्भवती महिला पोलिसांनी उपस्थित केला. नियम सर्वांना सारखे हवेत. मात्र कर्तव्यामुळे ही मंडळी काहीही न बोलता आपली सेवा बजावत आहे

मरोळ येथील सशस्त्र पोलीस दलात पोलीस शिपाई असलेल्या प्रणाली राणे चार महिन्यांच्या गर्भवती आहेत. वडील पोलीस असल्याने त्याहि पोलीस दलात भरती झाल्या. त्यांचे पती, सासरेही पोलीस दलात आहेत. सध्या त्या गोरेगावमध्ये गार्ड म्हणून कार्यरत आहेत. घरातील कामे उरकून ड्युटीवर वेळेत पोहोचण्यासाठी त्या सकाळी ७ वाजताच घर सोडतात. पुढे बस आणि लोकलसाठी त्या थांबलेल्या असतात. काही वेळा गर्दीमुळे त्या तासनतास बसच्या प्रतीक्षेत ताटकळत असतात. बस मिळवून कसेबसे ड्युटीचे स्थान गाठायचे. १२ तास काम केल्यनानंतर पुन्हा घरी जाण्याची कसरत करायची. मात्र, त्याची कधीही कोणतीही तक्रार नाही. मनात नेहमीच बाळाला काही होणार नाही ना अशी भीती असतेच पण कर्तव्यापुढे या विचाराकडे दुर्लक्ष करते. तुमचे बाळ, कुटुंब सुरक्षित रहावे म्हणून आम्ही पोटच्या गोळ्याकडे दुर्लक्ष करून धडपडत आहाेत, म्हणून तुम्ही घरी राहून सहकार्य करा. असे आवाहन प्रणाली राणे यांनी केले आहे. त्यांच्यासारख्याच अनेकजणी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत.