पतीचा ‘कोरोना’मुळे मृत्यू, त्यानंतर पत्नीनं केली आत्महत्या, 2 मुलं झाली पोरकी

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनामुळे रोज अनेकांचा मृत्यू होत आहे. कोरोनामुळे भोसरी येथील फुलेनगरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू. पतीच्या निधनानंतर खचलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.18) सकाळी उघडकीस आली. आई आणि वडिलांच्या जाण्याने दोन मुलं पोरकी झाली आहेत.

गोदावरी गुरुबसप्पा खाजुरकर (वय-30) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती गुरुबसप्पा उर्फ प्रकाश खाजुरकर (वय-35) यांचे दोन महिन्यापूर्वी 18 जुलैला कोरोनामुळे निधन झाले होते. प्रकाश हे टिव्ही फिटींग आणि इलेट्रिशियनचे काम करत होते. त्यांच्यावरच घराचा उदरनिर्वाह चालत होता. तर पत्नी गोदावरी या देखील काही कामे करुन संसाराला हातभार लावत होत्या. अवघ्या पस्तीाव्या वर्षात प्रकाश यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरु असताना निधन झाले.

प्रकाश यांना चांगले उपचार मिळावेत यासाठी परिसरातील लोकांनी प्रयत्न केले. मात्र18 जुलै रोजी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना 11 वर्षाचा मुलगा आणि 7 वर्षाची मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे. पतीच्या निधनानंतर कुटुंब रस्त्यावर आले. पतीच्या जाण्याने पुढे करायचे काय असा प्रश्न भेडसावत असताना पतिचा विरह सहन न झाल्याने पत्नी गोदावरी यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आपलेही जीवन संपवले. आई आणि वडिल हे जग सोडून गेल्याने ही दोन लहान मुले पोरकी झाली आहे. घरात आता दोन्ही मुलं आणि त्यांची आजी असे कुटुंब आहे.

शिवसेना शहर संघटक सुलभा उबाळे यांनी या दोन्ही मुलांचा पुढील खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. तर या परिसरातील माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे हे या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करणार आहेत. गोदावरी यांचे माहेरचे लोक आज संध्याकाळी सोलापूर कर्नाटक सीमेवर असलेल्या गावातून आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.