धक्कादायक ! मुलाच्या जन्मासाठी आईचा 28 KM प्रवास

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील सर्वात दुर्गम भाग असलेल्या गडचिरोलीमधील भामरागड इथे हृदयद्रावक घटना घडली आहे. या गावात एका 9 महिन्यांच्या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी तब्बल 18 किलोमीटरची पायपीट करावी लागली. इतकच नाही तर प्रसूतीनंतर 5 दिवसांनी पुन्हा आपल्या गावी परतण्यासाठी तिला तेवढेच अंतर चालत पार करावे लागले आहे.

तुर्रेमर्का गावात साधे रस्तेही नसल्यामुळे माळलेल्या पायवाटेवरून किंवा जंगलातून रस्ता काढत नागरिकांना रुग्णालयात जावे लागत आहे. अशा भागात राहणार्‍या रोशनी पोदाडी या महिलेला 3 जुलैला प्रसूतीसाठी 28 किलोमीटरचा प्रवास करावा लागला होता. त्यांनी एका मुलीला जन्म दिला. दोघांचीही प्रकृती स्थिर होती.रुग्णालयात प्रसूती झाल्यावर 5 दिवसांच्या उपचारानंतर आपल्या घरी जाण्यासाठी पुन्हा जंगलातून पायपीट करावी लागली. या महिलेसह शिशुला रुग्णवाहिकेने लाहेरीपर्यंत पोहोचवले होते. मात्र पुढे रस्ता नसल्याने 18 किलोमीटरचे अंतर पायी कापावे लागले. त्यापैकी जवळपास 8 किलोमीटरचा भाग हा डोंगर आणि जंगलाचा होता. या महिलेनं मोठ्या हिंमतीनं संकटांचा सामना केला आणि पुन्हा आपल्या गावी नवजात बाळासह सुखरुप परतली. मात्र या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त होता आहे.