घरकाम करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले. त्यामुळे 24 मार्चपासून देशभर लॉकडाऊन केले. मात्र, लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यापासून शिथिलता आणून आतापर्यंत सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत. मात्र, लॉकडाऊनमधून घरकाम करणाऱ्या महिलांची अद्याप सुटका झालेली नाही. अनेक ठिकाणी मोलकरणी काम करण्यास तयार आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीने त्यांना कामावर येण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे ‘काम नाही तर पगारही नाही’, अशी त्यांची अवस्था झाली आहे. घरोघरी जाऊन धुणीभांडी करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या कष्टकरी महिलांची आर्थिक कोंडी झाली आहे.

शहर आणि उपनगरामध्ये आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोलकरणी पुन्हा घरोघरी कामावर जाण्यास तयार आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी त्यांचे काम थांबवले आहे. त्याचा फटका कुटुंबाला हातभार लावण्यासाठी विधवा महिलांबरोबर इतरही महिलावर्गाला बसला आहे. काम केले तरच पगार मिळतो, त्यावरच अनेक विधवा महिलांचा घरखर्च अवलंबून आहे. सध्या अनेक लोक पुढे येऊन या वर्गासाठी मदत करीत आहेत. मात्र, घरकाम करणाऱ्या मोलकरणी त्या काम करत असलेल्या ठिकाणांकडूनच उपेक्षित असल्याचे दिसून येत आहे. आता शासनानेच त्यावर योग्य उपाय काढावेत, अशी मागणी या महिलावर्गाकडून होत आहे.

सध्याच्या परिस्थितीत घरकाम करणाऱ्या हजारो महिलांना आर्थिक चणचण भासत आहे. अनेकांकडून वेतन देण्यास नकार दिला जात आहे. आम्हालाच पगार नाही, तर तुम्हाला कोठून द्यायचा अशीही टिपण्णी ऐकावी लागत आहे. कोरोनामुळे त्या काम करत असलेल्या घरांमध्येही प्रवेश दिला जात नाही. लॉकडाऊन शिथिल केले आहे, तरीसुद्धा त्यांना कामावर येऊ नका, असे सांगितले जात आहे. घरकाम सुटले तर अन्य ठिकाणी काम करण्याचीही सध्या सोय नाही. त्यामुळे बँकांच्या कर्जाचे हप्ते, खाद्यसामग्री, जीवनावश्यक वस्तू, मुलांचे शैक्षणिक शुल्क याची चिंता असल्याने या महिला तणावाखाली जगत आहेत. घरकामगार महिला बहुसंख्य विधवा, आर्थिक दुर्बल असल्याने मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी १४ ते १६ तास काम करतात. या महिलांना शासनाकडून दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे.

अमेरिकेमध्ये घरकाम करणाऱ्या महिला थोड्या आहेत. मात्र भारतामध्ये घरकाम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, आपल्याकडे शोषित घरकाम करणारा वर्ग आहे, त्यांची कुठेही नोंद नाही. त्यामुळे शासन त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. मोठमोठ्या कंपन्यांनी मदत केली. मात्र, ती त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. त्यासाठी समाजातील शोषित घटकाला समाजाच्या प्रवाहाबरोबर आणण्यासाठी सोसायटी, मंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन काम करण्याची गरज आहे.
– संगीता तोडमल, अहमदनगर.

कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण यासाठी दिवसातील १४ ते १६ तास घरोघरी धुणीभांडी करते. पण लॉकडाऊनमुळे झाल्यापासून आम्हाला कामावर बोलवत नाहीत. अडीच महिने बेकारीत काढले आहेत. हीच स्थिती पुढेही सुरू राहिल्यास कोरोनाऐवजी उपासमारीने आमचा शेवट होईल.
– सीता लोंढे, घरकामगार

मार्च महिनाअखेरीस लॉकडाऊन सुरू झाले आणि अगदी सामान्य घरापासून ते उच्चवर्गीयांपर्यंत सर्वांच्या घरात घरकाम करणाऱ्या महिलांची वर्दळ थांबली. त्यानंतर आठ दिवसांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री दोघांनीही घरकाम करणाऱ्या महिलांचे पैसे द्या, असे आवर्जून सांगितले. मात्र, बहुतांश ठिकाणी प्रतिष्ठितांनीसुद्धा काम नाही, म्हणून पगार दिले नाहीत. माणूस इतका स्वार्थी छोट्या छोट्या गोष्टींसाठी होताना पाहिल्यानंतर माणूस लॉकडाऊनमध्ये काही शिकला का, ही शंका निर्माण झाली. कारण आपण घरी बसून पूर्ण पगार घेतोय, मात्र आपल्या घरी येणाऱ्या कष्टकरी महिलांना पैसे देत नाही, याचेदेखील वैशम्य वाटू नये, ही मानवी जीवनातील मोठी शोकांतिका लॉकडाऊनने दाखविली आहे. अर्थात हे शंभर टक्के समाज करतो, असे माझे मत नाही. मात्र, कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंद देण्याचा प्रयत्न करावा.
-डॉ. दीपक देशपांडे, कुलसचिव- एस.एन.डी.टी. विद्यापीठ.

कोरोनामुळे समाजामध्ये भीती निर्माण झाली आहे. सोसायटीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर येऊ देत नाहीत. दिवाळीनंतर तुम्हाला आम्ही कामावर बोलावू, असे सांगितले गेले. मात्र, मी स्वतः त्यांना कामावर बोलावले, लोकांना समजावून सांगितले त्यानंतर काही महिलांना कामावर बोलावले. काही सोसायटीमध्ये एकाच महिलेला बोलावा असाही नियम केला आहे. प्रत्येकाला कोरोनाची भीती आहे, त्यासुद्धा स्वच्छता बाळगतात. मात्र, नागरिक ते समजून घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. कोरोनामुळे अनेक महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.
– प्रा. रेश्मा देशपांडे, संचालिका- लोकमान्य विद्यानिकेतन केंद्र