हात, पाय, शीर कापलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे गुढ उकलले ; डान्सबार मध्ये काम करते म्हणून पतीने केला पत्नीचा ‘खात्मा’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाणे ग्रामीण पोलिसांना एका पिंपात हात, पाय, शीर कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता. त्या मृतदेहाचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नी डान्स बारमध्ये काम करते म्हणून पतीने तिचा खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिचे हात, पाय, शीर, धडापासून वेगळे करून मृतदेह फेकून दिला. याप्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

हमीद सरदार असे त्याचे नाव आहे. त्याला २६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

भिवंडी येथे सोनाळे गाव परिसरात १३ एप्रिल रोजी एका पिंपात हात, पाय, शीर कापलेल्या अवस्थेत महिलेचा मृतेदह पोलिसांना मिळाला होता. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा याचा समांतर तपास करत होती.

असा झाला उलगडा

ज्या ड्रममध्ये मृतदेह आढळला. त्याच्या बॅचची माहिती पोलिसांनी काढली. तेव्हा हा पिंप भिंवडी येथील भैरव सिंथेटिक या दुकानातून खऱेदी केला गेल्याचे समोर आले. हा ड्रम एका भंगार विक्रेत्याला विकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर भंगार विक्रेत्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने हा पिंप एका व्यक्तीला विकला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही तपासले तेव्हा एक व्यक्ती तो पिंप रिक्षातून घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी रिक्षाचा शोध लावून रिक्षाचालकाला विचारणा केली तेव्हा त्याने ज्या घरात पिंप नेला त्याचा पत्ता सांगितला. ते घर हमीद सरदार याचे असल्याचे समोर आले. पोलिसांनी तेथे चौकशी केल्यावर तो पश्चिम बंगालमध्ये पळून गेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला बंगालमध्ये सापळा रचून ताब्यात घेतले.

डान्सबार मध्ये काम करते म्हणून केला खून

सबीना ही डान्स बारमध्ये जाते याचा त्याला राग आला होता. त्या दिवशी सबीना घरात झोपली होती. त्यावेळी तिचे तोंड दाबून त्याने खून केला. ओळख पटू नये म्हणून तिचे हात, पाय, शीर धडावेगळे करून तो पिंपात फेकून दिला.