मुघल-ए-आझमची पुनरावृत्ती 

वडोदरा : वृत्तसंस्था – मुघल कालखंडात भींतीत जिवंत गाडण्याची शिक्षा दिली जायची. अकबराने  सलीमच्या अनारकलीला जिवंतपणे गाडण्याची शिक्षा दिली होती. इतिहासातील या घटनांशी संदर्भ जोडला जाईल अशीच घटना गुजरात मध्ये घडली आहे. गुजरातमधील दाहोद येथे येथील दुहेरी हत्याकाडांत गुन्हा लपवण्यासाठी गुन्हेगाराने मृतदेहाभोवती सिमेंटची पोती रचून कड तयार केल्याचं उघडकीस आलं आहे. नंदा सिसोदिया असं मृत महिलेचं नाव असून तिच्याच मैत्रणीने पतीच्या मदतीने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.

गुजरातमधील दाहोद येथे अंगणवाडी सेविका नंदा सिसोदिया आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती . त्याबाबतची  तक्रार २३ नोव्हेंबर रोजी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. या दोघींना भाभोर यांच्या निवासस्थानी शेवटचं पाहिल्याचा  पुरावा पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे पोलिसांचा नंदा यांची मैत्रीण मंजू भाभोर आणि तिचा पती दिलीप यांच्यावर संशय बळावला होता.

भाभोर दाम्पत्याची कसून चौकशी केल्यावर त्यांनीच या दोघींची हत्या केल्याचं उघडकीस आलं. भाभोर यांच्या घरामागे असलेल्या पाण्याच्या टाकीत नंदा यांचा मृतदेह लपवण्यात आला. तर नंदा यांच्या मुलीचा मृतदेह नदीत टाकण्यात आला. नंदा यांच्या मृतदेहाचा दुर्गंध येऊ नये, यासाठी त्याभोवती सिमेंटची पोती रचण्यात आली. सिमेंट हळूहळू घट्ट होत गेलं. या दोघांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी भाभोर दाम्पत्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घट्ट झालेली सिमेंटची पोती फोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक के. जी. पटेल यांनी दिली.