नग्न महिलेचे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं

बाराबंकी : वृत्तसंस्था – बंद पडलेल्या कारखान्याजवळ सूटकेसमध्ये अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री ही सुटकेस पोलिसांना सापडली असून या सूटकेसमध्ये नग्न महिलेच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यात आले होते. सूटकेसमध्ये शरीराचे तुकडे तर प्लास्टिकच्या बॅगेत मुंडकं ठेवल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुटकेस ताब्यात घेतली.

सर्कल ऑफिसर सुशील कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खून प्रकरणी पोलिसांना तपासादरम्यान सुटकेसजवळ एक सूट आणि चादरही सापडली आहे. या महिलेची ओळख अद्याप पटू शकली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा आधी खून करण्यात आला असावा आणि त्यानंतर अज्ञाताने मृदेहाचे तुकडे तुकडे करून या सुटकेसमध्ये भरून निर्जन ठिकाणी टाकले असावेत. मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या महिलेचं लैंगिक शोषण केलं असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहेत का ते समजेल असे पोलिसांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी मृतदेह टाकला असण्याची शक्यता आहे. तो सडल्याने दुर्गंधी येऊ लागल्याने लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी शहरातील सफेदाबाद येथे घडली आहे. पोलिसांच्या तपासात काही अंतरावर एक प्लास्टिकची बॅग आढळली आहे. त्यात महिलेचे मुंडकं आणि पाय सापडला आहे. तर उर्वरित शरीराचे तुकडे सुटकेसमध्ये सापडले आहे. पोलिसांकडून तपास सुरु केला आहे.