समाजामध्ये तळमळीने काम करणार्‍या महिलांचा सन्मान व्हावा : भावना नखाते

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – आज सर्व क्षेत्रामध्ये महिला आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. महिला या केवळ घर सांभाळणा-या नसुन समाजातील मोठमोठी आव्हाने सांभाळणा-या सबला झाल्या आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर आदी कर्तृत्ववान महिलांनी जो आदर्श उभा केला आहे. त्याचे महिलांनी आचरण करावे व आत्मविश्वासाने प्रश्नांना सामोरे जावे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन महिला विकासासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही सौ.भावनाताई नखाते यांनी केले.

parbhani2

दिनांक ८ मार्च २०२० रविवार रोजी शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा सत्कार सोहळा कार्यक्रमा प्रसंगी त्या अध्यक्षीय स्थानावरून बोलत होत्या. मा.अजित पवार यांनी यावर्षिच्या अर्थसंकल्पात महिला विकासासाठी १०० कोटी रुपये तरतुद केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील महिलांचे अनेक प्रश्न असुन आत्महत्या केलेल्या पुरूषांच्या विधवा महिलांच्या प्रश्नाचा उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्र राज्य महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा मा.सौ.रूपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा सन्मान व्हावा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे असे त्यांनी सांगितले.

समाजामध्ये तळमळीने कार्य करणा-या महिलांचा सन्मान व्हावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास नगरसेविका न.प.पाथरी मा.सौ.अर्पिताताई अलोक चौधरी,मा.सौ.उषाताई डुकरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सैनिकपत्नी सौ.अनिता रमेश वाघमारे, निवृत्त शिक्षिका श्रीमती निर्मला लक्ष्मणराव गडम, महिला डाॅक्टर आर्शिया सलिम शेख, महिला पोलिस कु.राजश्री रामभाऊ बहिरे, राज्यस्तरीय महिला खेळाडू कु.पल्लवी ज्ञानेश्वर चव्हाण, कु.मनिषा प्रभाकर खुडे, कु.सपना अर्जुन कटारे यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती कांबळे के.एच यांनी केले. गौरव झालेल्या महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुञसंचालन सौ.सुप्रियाताई झिंजाण यांनी तर आभारप्रदर्शन सुमती वझरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.