कॅब चालकाकडून महिलेची छेडछाड 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन- हिंजवडी परिसरात उबर कॅब मध्ये बसलेल्या संगणक अभियंता महिलेस आत मध्ये लॉक करुन, चालकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.

चालक तुषार बबनराव लांडगे या चालकाला अटक केली आहे. या प्रकरणी ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पीडित महिला या बाणेर येथे वास्तव्यास असून त्या हिंजवडीमधील नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चालक तुषार लांडगे हा त्यांना घेण्यासाठी गेला. प्रवासादरम्यान महिलेने कारमध्ये जेवणाचा डबा उघडला आणि त्या खात बसल्या. तुषारने त्या महिलेला कारमध्ये डबा खाण्यापासून रोखले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक भांडण झाले. त्यानंतर तुषारने आरशातून वाईट नजरेने पाहिले. तसेच अश्लिल इशारेही केले, असे महिलेचे म्हणणे आहे. हिंजवडी वाकड पुलाखाली गाडी आल्यानंतर तुषारने त्या महिलेला कारमधून उतरु दिले नाही. त्याने कार लॉक केली आणि आता तुझी काय अवस्था करतो, अशी धमकी देखील दिली होती, असा आरोप त्या महिलेने केला आहे. शेवटी कारमधून बाहेर पडल्यावर महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले आणि तुषारविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तुषारला अटक केली आहे.