Pune News : कुुटुंब नियोजनात अद्यापही पुरुष मागेच ! जिल्ह्यात 5 वर्षात केवळ 864 पुरुषांनी केली नसबंदीची शस्त्रक्रिया

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – स्त्री-पुरूष समानतेचा जागर आज सर्वत्र होत असला तरी ग्रामीण व शहरी भागातील कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांवर टाकली जात आहे. खरेतर कुटुंब नियोजन ही दोघांची सारखीच जबाबदारी असताना प्रत्यक्षात पुरुषांकडून शस्त्रक्रिया करण्यास टाळाटाळ केली जाते. त्याला पुरुषी अंहकार व वेगवेगळे गैरसमज कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात पाच वर्षात लाखभर महिलांच्या तुलनेत केवळ 864 पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत.

नुकताच जागतिक पुरूष नसबंदी सप्ताह पार पडला. लहान कुटूंब, सुखी कुटूंब ही संकल्पना मागील काही वर्षांमध्ये सर्वदूर पोहचली.यातुनतच कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेने गती पकडली. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कुटुंब नियोजन उपक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा यासाठी अनुदानाची तरतूद केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पुणे जिल्ह्यात आरोग्य केंद्रातंर्गत 1 लाख 2 हजार 698 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये केवळ 864 पुरुषांनी नसबंदी केली आहे. तर यामध्ये 1 लाख एक हजार 834 महिलांचा समावेश आहे.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणा-या अनुसुचित जाती- जमाती व दारीद्र्य रेषेखालील महिलांना 600 रुपये तर सर्वसाधारण महिलांना 250 रुपये अनुदान दिले जाते. यात पुरुषांचा सहभाग वाढावा, यासाठी 1400 रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाते. या अत्यंत सोप्या व गुंतागुंत विरहीत शस्त्रक्रियेबाबत जनजागृती करण्यसाठी स्थानिक स्तवरावर वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका प्रयत्न करत आहेत.

महिलांच्या कुटूंबनियोजन शस्त्रक्रियेच्या तुलनेत पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण फारच कमी आहे. पुरूषांमध्ये असणारे याबाबतचे गैरसमज आणि समाजाची मानसिकता याला कारणीभूत आहे. नसबंदी शस्त्रक्रिया केली म्हणून पुरूषांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी,पुणे जिल्हा परिषद

जिल्ह्यातील गेल्या पाच वषार्तील नसबंदी दृष्टिक्षेपात
वर्षे                 पुरुष                     महिला                    एकूण
2015-16        165                    23721                 23886
2016-17        331                    22611                 22942
2017-18        84                      18712                 18796
2018-19        33                      19149                 19282
2019-20       151                     17641                 17792