‘तिने’ केली १० ते ११ मुलांना पुरल्याची बतावणी ; पोलिसांची दमछाक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुलाचे अपहरण करणाऱ्या तरुणीला अटक केल्यानंतर तिने आणखी १० ते ११ मुलांना सहारा कॉलनीजवळील डोंगरात पुरल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. परंतु पोलिसांनी मंगळवारी तेथे जेसीबीच्या साह्याने खोदकाम केल्यानंतर तेथे काहीच आढळून आले नाही. त्यामुळे ती पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले आहे.

दोन वर्षीय मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी डायघर पोलिसांनी आफ्रीन खान (२०) या तरुणीला अटक केली.

मुंब्रा रेल्वे स्थानकावरून १० महिन्यांच्या सलमान खान या मुलाचे अपहरण ३ फेब्रुवारीला झाले होते. त्यापाठोपाठ भास्करनगर, कळवा येथूनही खुशी गुप्ता या ४ वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. तिचाही शोध लागला नाही, आफ्रीनला २ वर्षाच्या मुलाच्या अपहरणप्रकरणी अटक केली. त्यानंतर तिच्याकडे चौकशी केल्यावर तिने असंबद्ध माहिती दिली. तिने १० ते ११ मुलांना पुरल्याची बतावणी केली. परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी तेथे खोदकाम केले. मात्र काहीच आढळले नाही. तिच्याकडे इतर मुलांसंबंधात चौकशी करताना पोलीस मारहाण करतील या भितीने तिने ही माहिती दिल्याचा दावा आफ्रीनने केला आहे. त्यामुळे तिची पुढे चौकशी सुरुच राहणार आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली.

You might also like