रणरागिणींची धडाकेबाज कामगिरी ; पोलीसांच्या दुर्लक्षामुळे सुरु असलेली ‘ती’ हातभट्टी केली उध्वस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खेड तालुक्यातील चास येथे अवैधरित्या सुरु असलेल्या हातभट्टीविषयी पोलिसांकडे वारंवार तक्रार करुनही त्यांनी दुर्लक्ष केले. मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार करुनही काही उपयोग न झाल्याने शेवटी गावातील रणरागिणींनी एकत्र येऊन चास येथील बेकायदा दारूची हातभट्टी उद्वस्त केली आहे.

शिरूर-भीमाशंकर राज्य मार्ग क्रमांक ५४वर असणाऱ्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याजवळ महिलांकडून दोन वर्षांपासून अवैधरित्या देशी दारूची विक्री केली जात आहे. महिलांनी अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांना संबंधित महिला विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी दुर्लक्ष केले. तसेच विक्रेत्यासही गावातील महिलांनी वारंवार दारू विकू नको, अशी विनंती केली. परंतु, विक्रेत्याने दारूची विक्री बंद करणार नसल्याचे सांगितले.

शुक्रवारी महिलांनी आक्रमक होत, शेणाच्या उकिरड्यात काढून ठेवलेली हातभट्टीची दारू धाड टाकून जवळपास दहा ते बारा ड्रम बाहेर काढून फोडून टाकले. तसेच महिलांनी खेड पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले. या हातभट्टी केमिकल्स मिश्रित दारूसेवनामुळे तीन व्यक्तींना चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात पडून वाहून जाऊन जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

शेवटी वैतागून शुक्रवार दि.१७ रोजी गावातील रणरागिणींनी व तरुणांनी सदर अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणावर जावून, तेथील दारू विक्री करणा ऱ्या महिलांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता या महिलांनी या तरुणांना व जाब विचारणाऱ्या महिलांना धमकी देवून गावात माणूस राहणार नाही, अशा वल्गना केल्या. याशिवाय आम्ही कोणा कोणाला पैसे देवून आमचा धंदा कोणाच्या कृपाआशीर्वादाने सुरू आहे. याचीही माहिती दिल्याने चिडून जावून महिला व तरुणांनी अवैधपणे विक्री होत असलेली दारूची कॅन ओतून फोडून टाकली. या अगोदर खेड पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण करण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाचा अर्ज सरपंच शकुंतला मुळूक, संजय मुळूक यांनी पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांना पाठविलेल्या विनंती अर्जात केली होती.