1000 ची लाच मागितल्याने महिला पोलीस ‘बडतर्फ’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – पासपोर्टसाठी पोलीस पडताळणी अहवाल अनुकुल व लवकरात लवकर पाठविण्यासाठी पती, पत्नीकडून प्रत्येकी पाचशे रुपये लाच मागणाऱ्या महिला पोलीस शिपायाला आपली नोकरी गमविण्याची पाळी आली आहे. विभागीय चौकशीत दोषी ठरल्याने त्यांना थेट शासकीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी हा आदेश काढला आहे.

पोलीस शिपाई प्रियंका वाघ असे या महिला पोलीस शिपाईचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, प्रियंका वाघ यांची विमानतळ पोलीस ठाण्यात नेमणूक होती. तेव्हा हा प्रकार ३० जुलै २०१७ रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात घडला होता. पासपोर्ट पडताळणी कामकाजासाठी मदतनीस म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती.

तक्रारदार व त्यांची पत्नी पासपोर्टच्या चारित्र्य पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात आले होते. वाघ यांनी या दोघांची कागदपत्रे तपासले. त्यानंतर त्यांच्याकडे प्रत्येकी पाचशे रुपये अशी एक हजार रुपयांची लाच
मागितली. त्यांनी याबाबतची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केल्यावर त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात त्या दोषी असल्याचे सिद्ध झाले. विभागीय चौकशीतील निष्कषार्नुसार त्यांना शासकीय नोकरीतून काढून टाकण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यावर त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांना अपर पोलीस आयुक्तांनी बडतर्फ करण्याचा आदेश काढला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –