परीक्षेला विलंब, पत्नीला प्रवेश नाकारला, पतीचा हृदयविकाराने मृत्यू

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – कृषी सहायक पदाच्या परीक्षेत केवळ पाच मिनिटाचा उशीर झाल्यामुळे पत्नीला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे मानसिक तणावातून पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शहरापासून जवळचा असलेल्या होरायझन शाळेत घडली. दरम्यान या मृत्यूसाठी शाळेचे व्यवस्थापनाला जबादार धरीत व्यवस्थापनावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी नातेवाईकांनी गोंधळ घातल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काही मिनिटे उशीर झाल्यामुळे नाकारला प्रवेश

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील मुक्ता देशमुख यांची आज शहरापासून जवळच असलेल्या विष्णूपुरी येथील होरायझन शाळेमध्ये कृषी सहायक पदासाठीची परीक्षा होती. या परिक्षेस मुक्ता देशमुख यांचे पती गजानन देशमुख हे परीक्षा केंद्रावर त्यांना सोडविण्यासाठी आले होते. परंतू परीक्षा सुरु होवून काही मिनिटे झाली असतानाच परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापनाने त्यांना प्रवेश नाकारला. परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारल्यामुळे मानसिक तणावातून गजानन देशमुख यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

या घटनेचे वृत्त मुक्ता देशमुख यांनी नांदेडमधील आपल्या नातेवाईकांना कळविले. त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले आणि गजानन देशमुख यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल होरायझनच्या व्यवस्थापनाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. होरायझन परिसरात यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळी धाव घेत मयताच्या नातेवाईकांना समजविण्याचा प्रयत्न केला.