Satara News : धक्कादायक ! पहिल्या बायकोला TV आणायला नेल्याने दुसरीने गळफास घेऊन केली आत्महत्या

साताराः पोलीसनामा ऑनलाईन – पतीने पहिल्या बायकोला टीव्ही आणायला नेल्याचा राग मनात धरून दुसऱ्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कवठे (ता. खंडाळा) येथे सोमवारी (दि. 22) रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली आहे.

पार्वती दगडू फुलसुरे (रा. औंढा, पो. बडूर, ता. निलंगा, जि. लातूर. सध्या कवठे, ता. खंडाळा, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी दगडू नरसिंग फुलसुरे यांनी फिर्याद दिली आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडू फुलसुरे हे मजूर असून त्यांचे दोन विवाह झाले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव गुणबाई, तर दुसऱ्या पत्नीचे नाव पार्वती आहे. गेल्या काही दिवसांपासून घरी टीव्ही आणा अशी मागणी पार्वती करीत होती. सोमवारी दगडू यांना पार्वती यांनी टीव्ही घेऊन या, असे सांगितले. यावर दगडू यांनी तू लहान मुलीला घेऊन घरीच थांब. मी आणि गुणाबाई (पहिली पत्नी) टीव्ही घेऊन येतो, असे सांगितले. याचा पार्वती यांना राग आल्यामुळे भांडी, कपडे यांची आदळाआपट सुरु केली. या वेळी दगडू यांनी पार्वती यांची समजूत काढली आणि ते गुणाबाई यांना घेऊन सकाळी शिरवळ येथे गेले. दरम्यान दगडू आणि गुणाबाई टीव्ही आणण्यासाठी गेले. मात्र, मला घेऊन गेले नाहीत, याचा राग आल्याने पार्वतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तपास महिला पोलिस उपनिरीक्षक व्ही. ए. देसाई करत आहेत.