Pune News : काय सांगता ! होय, लाच प्रकरणात महिला न्यायाधीशाचाच सहभाग, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   वडगाव मावळ न्यायालयात सुरु असलेला फौजदारी खटला न्यायाधिशांना मॅनेज करुन रद्द करण्यासाठी 50 हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणात महिला न्यायाधिशांचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लाचलुपच प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासात महिला न्यायाधीशांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी न्यायाधीशांनी अर्ज केला असून त्यावर 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय-29 रा. तळेगाव) या महिलेला 13 जानेवारी रोजी किवळे येथे 50 हजार रुपयाची लाच स्विकारताना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना वडगाव मावळ न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना दीपक जतकर यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वडगाव मावळ तालुक्यातील इंदुरी येथील 32 वर्षीय व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिली आहे.

फिर्यादी कडजई माता दूध संकलन मंडळाचे अध्यक्ष आहेत. दूध संकलन करुन एका डेअरीला घातले जाते. डेअरी चालकाने फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्यात तुम्हाला अटक होणार आहे. हा खटला रद्द करण्यासाठी न्यायाधीश मॅनेज करण्यासाठी गायकवाड या महिलेने फिर्यादी यांच्याकडे अडीच लाख रुपये लाचेची मागणी केली असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी शुभावरी गायकवाड या महिलेला 14 जानेवारी रोजी अटक केली.

या प्रकरणात जामिन मिळावा यासाठी गायकवाड या महिलेने अ‍ॅड. सुधीर शहा, सुहास कोल्हे आणि राहुल भरेकर यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी तिची 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. गायकवाड यांच्या जामिन अर्जास विरोध करताना या गुन्ह्यामध्ये न्यायाधीशाचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्यात नाव आल्यानंतर न्यायाधीशांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावर 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या गुन्ह्यात न्यायाधिशांचा समावेश असल्याने त्यांना अटक करण्याची परवानगी मिळावी, यासाठी जिल्हा न्यायाधीशांकडे अर्ज केला आहे. परंतु, त्यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे पाठवल्याने सध्या हा अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.