अल्पवयीन मुलाशी लग्न करणाऱ्या ‘त्या’ महिलेचा जमीन अर्ज फेटाळला

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाशी  लग्न  करणाऱ्या २२ वर्षीय महिलेला जामीन देण्यास मुंबईला सत्र न्यायालयानं शनिवारी नकार दिला आहे. शनिवारी या प्रकरणाची इन कॅमरा सुनावणी झाली. सदर महिलेवर पोक्सो, अपहरण आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी काल सुनावणी शनिवारपर्यंत तहकूब करण्यात आली होती.

अल्पवयीन मुलाच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर वर्षभराच्या तपासानंतर या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सदर महिलेची पाच वर्षांची मुलगी असून तीदेखील सध्या भायखळा जेलमध्ये तिच्या आईसोबतच आहे.

काय आहे प्रकरण 

अल्पवयीन मुलाच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार या मुलीचा याआधी दोनवेळा घटस्फोट झालेला आहे. तसेच आपल्या मुलाचं वय लग्नाच्यावेळी १७ वर्ष ८ महिने असल्याचं सांगितले आहे. एकेदिवशी ही महिला रात्री अचानक मुलाच्या घरी आपल्या नातेवाईकांसह दाखल झाली. तुमच्या मुलानं माझ्याशी लग्न केलं असल्यानं आता मी याच घरात राहणार असल्याचा दावा केला. मुलाच्या आईवडिलांनी याला विरोध करताच महिलेनं तिच्या नातेवाईकांसह त्यांना दमदाटी केली व स्वत:ला इजा करून घेण्याची धमकी दिली. या घटनेनंतर मुलगाही आईवडिलांचं घर सोडून गेला. या सगळ्याचा मुलाच्या मानसिकतेवर इतका परिणाम झालाय की तो दहावीच्या परिक्षेत यंदा नापास झाला.

या महिलेनं जामीनासाठी अर्ज करताना म्हटलंय की नवऱ्याशी असलेलं आपलं नात हे दोघांच्या सहमतीनं आहे. तसेच मुलगा लग्नाच्यावेळी अल्पवयीन असल्याचा तक्रारदार आईचा दावा खोटा असल्याचाही दावा केला आहे. तक्रारदार महिलेला तीन मुलं आहेत. ज्यातील मोठी मुलगी २० वर्षांची असून त्यानंतरची दुसरी मुलगी ही १८ वर्षांची आहे. मग तिसरा मुलगा १७ वर्ष ६ महिन्यांचा कसा असू शकतो? असा दावा केला होता.