‘त्या’ महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा ‘एसपी’ कार्यालयात गोंधळ

पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यासह अन्य चौघांविरुद्ध विनयभंग केल्याचा आरोप करणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पुन्हा अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घातला. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. यावेळी महिला वैद्यकीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यातही चांगलाच गोंधळ घातला.

त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी आपल्याला शरीरसुखाची मागणी केली. त्यासाठी त्यांना तळवेल येथील औषधी निर्माता राजेंद्र राठी, डॉ. हेमंत फुके व अन्य एका महिला डॉक्टरने सहकार्य केले, असा आरोप करीत तळवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून कार्यमुक्त करण्यात आलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने सोमवार, १८ मार्च रोजी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीवरुन डॉ. आसोले यांच्यासह चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींवर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी तक्रारकर्त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात चांगलाच गोंधळ घातला होता. यावेळी त्यांनी आरोपींना तातडीने अटक न केल्यास सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता.