Pune : चाकणमध्ये महिलेचा खून

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – घरासमोरील रस्त्याच्या वादातून एका महिलेचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) सकाळी आठच्या सुमारास चाकण येथील मेदनकरवाडी येथे घडली. मृत महिला सकाळी घराबाहेर भांडी घासत असताना चार जणांनी तिच्यावर हल्ला करून तिचा खून केला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पना विक्रम शितोळे (वय-४५ रा. मेदनकरवाडी) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणात अनिल मधुकर हेंद्रे, सुवर्णा हेंद्रे, सिद्धेश हेंद्रे आणि सुशीला शांताराम भुसारे (सर्व रा. मेदनकरवाडी) यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम नारायण शितोळे (वय-४८) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी यांच्यामध्ये घरासमोरील रस्त्यावरुन वाद होते. याच वादातून आरोपींनी आज सकाळी मृत कल्पना शितोळे या घराबाहेर भांडी घासत असताना त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी दगडी पाटा, लाकडी दांडके आणि कुकरच्या झाकणाने कल्पना यांना बेदम मारहाण केली. तसेच दगडी पाटा डोक्यात घातल्याने कल्पना या गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Loading...
You might also like