Pravin Darekar : ‘दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून न्यालालयाबाहेर आरोपी शिवकुमारला फाशी देण्याची मागणी करत त्याचे छायाचित्र जाळले होते. आता या प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. ठाकरे सरकार या प्रकरणी गंभीर दखल घेईल, अशी आशा बाळगतो, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला धारणी न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडीत पाठविले. त्यानंतर त्याला पाठीशी घालणाऱ्या अमरावती वनक्षेत्राचे तत्कालीन निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. दरम्यान रेड्डी याने बुधवारी अचलपूर येथील जलदगती न्यायालयात दाखल केलेल्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर तपास अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेतली जाईल. त्यानंतरच निर्णय होईल, असे न्यायमूर्ती एस.के. मुंगीनवार यांच्या न्यायालयाने स्पष्ट केल्याने रेड्डीला तूर्त दिलासा मिळाला नाही. अटकपूर्व अर्जावर 3 एप्रिल रोजी सरकारी अभियोक्ता किंवा तपास अधिकारी यांना म्हणणे मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.