Nashik News : 70 बेपत्ता महिलांचा लावला शोध, महिनाभरात 500 गुन्ह्यांची उकल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडल 1 मधील सहा पोलिस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महिनाभरात तब्बल 70 बेपत्ता महिलांचा शोध लावत 500 विविध प्रलंबित गुन्ह्यांचा तपासात चमकदार कामगिरी केली आहे. महिलांच्या गतिमान कामकाजाबद्दल पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते महिला पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. बेपत्ता महिलांचा तपास करताना काही महिला अधिकाऱ्यांनी नेपाळपर्यंत संशयितांचा पाठलाग केला होता.

नाशिक शहरात डिसेंबरमध्ये पोलिस आयुक्तांनी महिला अत्याचाराच्या गुन्हे तपासाचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाही पोलिस ठाण्यांतील महिला अधिकाऱ्यांनी 1 हजार चारपैकी तब्बल 500 गुन्हे उघडकीस आणले. विनयभंग, अत्याचार, कौटुंबिक अत्याचार, बेपत्ता आदी गुन्हे उघडकीस आणले आहेत. यात 17 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

महिलांच्या छे़डछा़ड प्रकरणात बळाचा वापर करण्याचे निर्देश
टवाळखोरांना चोप, मावळत्या वर्षाला निरोप देतानाच महिलांच्या छे़डछा़ड प्रकरणात महिला पोलिसांना बळाचा वापर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. या सगळ्या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्तांनी उपनिरीक्षक उमा गवळी, चांदनी पाटील, सी. एस. पाटील, जयश्री अनवणे, प्रियंका गायकवाड, योगिता कोकाटे, पार्वी राठोड, क्षितिजा रेड्डी, तसेच पोलिस नाईक अनिता पाटील, सरला घोलप, ललिता वाघ, जयश्री राठोड, जयश्री कांगणे, शुभांगी आवारे, रीना आहेर, वनिता पैठणकर, सोनाली वडारकर आदींना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.