पोलीस दलात महिला अधिकार्‍यांचे प्रमाण होणार 30%, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील पोलीस दलामध्ये महिला अधिकारी, कर्मचार्‍यांचे प्रमाण सध्याच्या १५ टक्क्यांवरुन ३० टक्क्यांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील आहे, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने केली आहे. मुंबईत महिला सुरक्षा मार्च काढण्यात आला होता. या मार्चमध्ये अनिल देशमुख आपली पत्नी आरती देशमुख यांच्यासह सहभागी झाले होते.

मुंबई पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध शाळांच्या विद्यार्थीनी, आरएसपीच्या विद्यार्थीनी, विद्यार्थी या सुरक्षा मार्चमध्ये सहभागी झाले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह उपस्थित होते.

अनिल देशमुख यांनी सांगितले की, राज्यात सुमारे सव्वा दोन लाख अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यापैकी सुमारे २८ हजार म्हणजेच १५ टक्क्यांच्या जवळपास महिलांचे प्रमाण आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्या उत्कृष्ट काम बजावत आहे. महिला पोलिसांचे प्रमाण वाढवून ३० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी शासनाचा प्रयत्न राहील़. मरीन ड्राईव्हवरील पदपथावरुन निघालेली ही पदयात्रा पोलीस बँडची धून, घोडेस्वार (माऊंटेड) पोलीसांचा डौल यामुळे प्रेक्षणीय ठरली.