महिलांसाठी खुशखबर ! प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पोलिस स्टेशन, अजित पवारांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पोलीस ठाणे महिला पोलीस ठाणे असणार आहे. या ठिकाणचे सर्व अधिकारी व कर्मचारी महिला असतील. या पोलीस ठाण्यात जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणचे महिलांविषयक गुन्हा दाखल करता येईल. अर्थसंकल्पात ही घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

पोलीस दलात आजही महिला अधिकारी व कर्मचार्‍यांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. आर आर पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात व पोलीस आयुक्तालयात किमान २ ते ३ पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी महिला अधिकार्‍यांची नेमणूक करावी असा आदेश काढला होता. ते गृहमंत्री असताना काही ठिकाणी याची अंमलबजावणी झाली होती. त्यानंतर या आदेशाकडे घटक प्रमुखांनी दुर्लक्ष केले. अगदी महिला पोलीस अधिकारी घटक प्रमुख असतानाही या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

आज अनेक जिल्ह्यात तसेच पुणे शहरात या आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या घोषणेचे पोलीस दलातून कसे स्वागत होते, याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.