तुकाराम मुंढे यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेण्याचे प्रकार घडले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्याविरुद्ध नागपुरात कोणतेही मुद्दे हाती लागत नसल्याचं पाहून माझ्या चारित्रहननाचे प्रकार घडविण्यात आले. महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेण्याचे प्रकार घडले, असा गौप्सस्फोट सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एका मराठी वृत्तपत्राशी बोलताना केला आहे. सातत्याने माझ्याविरोधात आरोप करण्यात येत होते, पद्धतशीरपणे मला टार्गेट करण्यात आलं. माझे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न चारपाच महिने सुरु होते. असे का करण्यात आले ? त्यात भाजपचे लोक होते, दुसरे कोण करणार ? असा सवाल मुंढे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

गेल्या काही वर्षात मी आक्रमकपणा कमी केला, स्वतःच्या स्वभावाला मुरड घातली, मात्र यापुढे माझ्या कितीही बदल्या करण्यात आल्या तरी मी आयुष्यात तत्वांशी तडजोड करणार नाही. तत्वांना तिलांजली दिली तर ते माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होते, अशी भावना व्यक्त करत नागपूर महापालिका आयुक्तपदावरुन माझी बदली व्हावी असा, काय गुन्हा केला होता, असा प्रश्न यावेळी तुकाराम मुंढे यांनी उपस्थित केला. मुंढे सध्या कोरोना बाधित असून नागपुरात घरगुती विलगीकरणात आहेत.

भाजपाला त्रास देण्यासाठी आपल्याला नागपुरात पाठवण्यात आले होते का ? तुम्ही भाजपविरोधक आहेत का ? असा प्रश्न विचारला असता मुंढे म्हणाले, अजिबात नाही. मी जिल्हाधिकारी व आयुक्त म्हणून जिथे गेले तिथे प्रस्थापित राजकारण्यांनी मला विरोध दर्शवला, त्यामध्ये वेगवगेळ्या पक्षाचे नेते होते. मात्र जनतेने माझे स्वागतच केले. मी कोणाच्याही विरोधासाठी वा बाजू घेण्यासाठी काम करत नाही. शासकीय अधिकारी म्हणून निःपक्षपणे काम करतो. नागरी सेवक तो माझा रोल आहे. सत्तेच्या मागे धावणे हा आमचा रोल नसतो, काही लोक ते करतात. मी घटनेच्या चौकटीत लोकाभिमुख काम करतो. शासकीय अधिकारी म्हणून मी काम करतो याचा अर्थ मी कोण्या पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत नाही. पण माझ्या चारित्र्यहननापर्यंतचे प्रकार घडले हे वेदनादायी असल्याचं मुंढे यांनी सांगितलं.

नागपुरातील लोकप्रतिनिधींनी तुम्हाला समजून घेतलं नाही का? सर्वपक्षीय नेते तुमच्याविरुद्ध का एकवटले? असे विचारले असता मुंढे यांनी म्हटलं की, समजून घेतलं असं मी म्हणणार नाही, त्यांना मला समजूनच घ्यायचं नव्हतं. सर्वपक्षीय नेते माझ्याविरोधात एकवटले असे मला नाही वाटत. तसे चित्र निर्माण केले गेले. भाजप मुख्यत्वे विरोधात होता. राजकीय विश्लेषण मला करायचे नाही.

तुमचा राजकीय बळी गेला असे तुम्हाला वाटते का? यावरती बोलताना मुंढे म्हणाले, अनेक गोष्टी होत्या. पावसाळ्यात साडेतीनशे टँकर चालायचे मी ते अर्ध्याहून कमी केले. लोक माझ्यावर खुश का आहेत तर महापालिका इतक्या चांगल्या प्रकारे काम करु शकते हे लोकांना पहिल्यांदा कळलं. म्हणून माझ्या बदलीचा लोक निषेध करताहेत. राजकीय बळी गेला यावरती मी भाष्य करणार नाही, मी राजकारणी नाही. मी कोणत्याही नेत्यावर आरोप करणार नाही. जे पटले ते मी आधी सुद्धा बोललो आहे. मी लोंकांसाठीच काम करतो, पण माझीच बदली वारंवार का केली जाते, असा मी काय गुन्हा केला, याचे उत्तर मला मिळत नाही.

यापुढे काय करणार आहात मुंढे असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, सात महिन्याच्या कालावधीत नागपुरात बदल घडवला. सरकारने बदलीचा आदेश दिला आहे पण खरं सांगायचं तर लोकांचा थेट संबंध असलेल्या संस्थांमध्ये काम करायला मला नेहमीच आवडत. प्रत्येक ठिकाणी किमान दोन वर्षे मिळाली पाहिजेत. कारण समाजात असंख्य नागरी प्रश्न आहेत आणि कुठलाही दबाव सहन न करता काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची तेवढीच गरज आहे. माझे आईवडील शेतकरी. जेवढं लोकांचं भले करता येईल तेवढं भलं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान त्यांनी मला दिलं. त्यानुसार मी चालत राहणार.