महिलांनी अंधश्रद्धांना मूठमाती देऊन सक्षमीकरणाकडे वाटचाल करावी – अ‍ॅड. गवांदे

श्रीगोंद्यात महिला प्रबोधन मेळावा

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – महिलांनी जुन्या रूढी, परंपरा, वाईट चालीरिती आणि अंधश्रद्धांना मूठमाती देऊन चिकित्सक व विज्ञानवादी बनून सक्षमीकरणाकडे वाटचाल केली पाहिजे असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यसचिव अ‍ॅड. रंजनाताई गवांदे यांनी केले आहे.

ग्रामीण विकास केंद्र आणि कोरो मुंबई संचालित महिला समस्या निवारण केंद्र श्रीगोंदाच्या वतीने आयोजित महिला प्रबोधन मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे, महिला दक्षता समितीच्या सदस्या अ‍ॅड. विजया घोडके, जेष्ठ पत्रकार प्रा. बाळासाहेब बळे, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहळ आदी यावेळी विचारपीठावर उपस्थित होते.

महिलांना मार्गदर्शन करतांना अ‍ॅड. गवांदे पुढे म्हणाल्या की, महिलांनी पुढाकार घेऊन समाजातील बालविवाहासारख्या वाईट प्रथा बंद केल्या पाहिजेत. उपवास, तापास, बुवाबाजी, भोंदूगिरीला बळी न पडता चिकित्सक बनले पाहिजे. महापुरुषांची चरित्रे वाचून त्यानुसार त्यांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे. वैचारिक पुस्तके हेच आपले दागिने समजून स्त्री सक्षमीकरणाकडे वाटचाल केली पाहिजे असे त्या म्हणाल्या.

अ‍ॅड. विजया घोडके यांनी महिलांचे हक्क, अधिकार व संरक्षण विषयक कायद्याची माहिती दिली. नगराध्यक्षा शुभांगी पोटे म्हणाल्या की, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे.

यावेळी प्रा. बाळासाहेब बळे म्हणाले की, ग्रामीण विकास केंद्राच्या वतीने कर्जत, जामखेड, श्रीगोंदा परिसरातील भटके विमुक्त समाजातील एकल महिलांसाठी राबविलेले सर्व उपक्रम महिलांसाठी फायदेशीर ठरणार आहेत.

यावेळी बापू ओहळ, जयश्री काळे, सुनीता बनकर, छाया रसाळ, लता सांगळे, छाया भोसले, लता सावंत यांचीही भाषणे झाली. मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले.

लोकाधिकार आंदोलनाचे प्रमोद काळे यांनी प्रास्ताविक केले. बिभीषण गदादे यांनी सूत्रसंचालन केले. भगवान राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काजोरी पवार, दिगंबर पवार, संतोष भोसले, तुकाराम पवार, विलास काळे, ज्योती भोसले, संतोष गर्जे, काका काळे, अतुल काळे, आसाराम काळे, शरद काळे, मनीषा शिनगण, उज्वला भवाळ, राजेश काळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील भटके विमुक्त, आदिवासी, ओबीसी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Loading...
You might also like