Kolhapur News : 7 महिन्याच्या बाळसह मातेची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – अवघ्या 7 महिन्याच्या तान्हुल्यासह एका महिलेने साडीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. कागल औद्योगिक वसाहातीमधील मेट्रो टेक्सटाईल पार्कमध्ये बुधवारी (दि. 10) सकाळी सव्वासात वाजता ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

संबरी लक्ष्मीधर मरंडी ( वय 24 मूळ ओडिसा, सध्या रा. कागल ) व मुलगा भगवान (वय 7 महिने ) अशी त्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिसा येथील लक्ष्मीधर भगवान मरंडी हे मेट्रो टेक्स्टाईल पार्कमधील सुत गिरणीत कामाला आहेत. मिलच्या शेजारीच कामगारांना राहण्यासाठी बांधलेल्या खोल्यात लक्ष्मीधर आपली पत्नी संबारी आणि मुलगा भगवान यांच्यासह राहत आहेत. रात्रीपाळी असल्याने रात्री अकरा वाजता ते कामावर गेले होते. सकाळी सव्वासात वाजता कामावरून घरी परतल्यानंतर घराचा दरवाजाचा आतून बंद असल्याने तो उघडण्यासाठी पत्नीला हाक मारली. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजारील कामगारांच्या मदतीने दरवाजा उघडला. घरात गेल्यानंतर त्याला पत्नीने मुलासह साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे दिसले. घटनेची माहिती कागल आणि गोकुळशिरगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान करवीरचे पोलिस उपअधिक्षक आर. आर. पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली.