40,000 हजारांची लाच घेताना महिला तलाठी, खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

शिरुर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रारदार यांच्या 7/12 उताऱ्यावर नाव नोंदणीसाठी आणि जमिन वाटपाची नोंद करण्यासाठी शिरुर तालुक्यातील सजा कोरेगाव भिमा येथील महिला तलाठी आणि खासगी इसम यांना 40 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. महिला तलाठी आणि खासगी इसमावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलाठी अश्विनी दत्तात्रय कोकाटे (वय-32) आणि खासगी इसम निवृत्ती लक्ष्मण कानगुडे (वय-29) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांनी त्यांच्या 7/12 उताऱ्यावर नाव नोंदणीसाठी आणि जमिन वाटपाची नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. नावनोंदणी आणि जमिन वाटपाची नोंद करण्यासाठी महिला तलाठी अश्विनी कोकाटे आणि खासगी इसम निवृत्ती कानगुडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.12) पडताळणी केली असता दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून महिला तलाठी अश्विनी कोकाटे यांना 20 हजार आणि खासगी इसम निवृत्ती कानगुडे याला 20 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तलाठी कोकाटे आणि खासगी इसम कानगुडे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक ज्योती पाटील करीत आहेत.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.