न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – महिलांसाठी स्वतःचे घरच असुरक्षित बनल्याचा धक्कादायक निष्कर्ष संयुक्त राष्ट्रांच्या मादक पदार्थ आणि गुन्हेगारी कार्यालयाने केलेल्या अभ्यासातून काढला आहे. २०१७ मध्ये एकूण ८७ हजार महिलांना जाणीवपूर्वक ठार करण्यात आले. यातील ५८ टक्क्यांहून अधिक महिलांना त्यांच्या जोडीदारांकडून किंवा कुटुंबियांकडून ठार करण्यात आल्याचे पुढे आले आहे. एक तृतीयांशहून अधिक महिलांना त्यांच्या सध्याच्या किंवा माजी जोडीदारांकरून हेतूपूर्वक ठार करण्यात आले. ज्या व्यक्तींवर महिला सहजपणे विश्वास ठेवू शकतात, अशाच व्यक्तींकडून त्यांचा घात झाल्याची प्रकरणे उजेडात आली आहेत.
घरच महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित बनत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. ५ वर्षांपूर्वी २०१२ मध्ये एकूण ४८ हजार महिलांची त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून हत्या झाली होती. सध्या प्रत्येक तासाला ६ महिलांची त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून हत्या होत आहे. अशी प्रकरणे वाढत असल्याचे या कार्यालयाने म्हटले आहे. २५ नोव्हेंबरला महिलांविरुद्ध हिंसा निर्मूलन दिनानिमित्त हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला.
महिलांना लिंग असमानतेमुळे अद्यापही दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे. महिलांचा समाजातील दर्जा आणि भूमिका यात थोडा-फार फरक झाला आहे. तरीही, महिलांच्या हत्यांना बहुतांशी पुरुषप्रधान मानसिकता कारणीभूत ठरत आहे. जगातील १ लाख महिलांपैकी १.३ महिला याला बळी पडत आहेत. यूएनओडीसीचे कार्यकारी संचालक युरी फेडोटोव्ह यांनी ही माहिती दिली. आफ्रिका आणि अमेरिकेतील अभ्यासानुसार, आफ्रिकेतील १ लाख महिलांमागे ३.१ महिलांची जोडीदार किंवा कुटुंबियांकडून हत्या होते. अमेरिकेत हा दर १ लाखामागे १.६, ओशियनियामध्ये १.३, आशियामध्ये १.९ आहे. जोडीदार किंवा कुटुंबियांकडून ठार झालेल्या महिला आणि पुरुषांच्या प्रमाणात अनुक्रमे ८२ टक्के आणि १८ टक्के एवढी प्रचंड तफावत आहे. तसेच, दिवसेंदिवस एकीकडे महिला सबलीकरण सुरू असताना महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याचेही उघड झाले आहे.