महिला क्रिकेट संघाचे इंग्लंड समोर 203 धावांचे लक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारत विरूद्ध इंग्लड यांच्यामध्ये महिला संघाच्या तीन सामन्यांच्या एकदिवशीय मालिकेस आजपासून (दि. 22) सुरुवात झाली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लडला 203 धावांचे आव्हान दिले आहे. प्रथम फलंदाजी करताना मिताली राज आणि कंपनीने 49.4 षटकांत सर्वबाद 202 धावा केल्या आहेत. दरम्यान, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

भारतीय सलामीवीरांना चांगली सुरुवात केली. परंतु, नंतर ठराविक अंतराने पडझड होत राहिली आहे. गेल्या काही सामन्यांत सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्ज-स्मृती मानधना जोडीने 69 धावांची भागिदारी केली आहे. परंतु, वैयक्तीक 24 (42) धावांवर स्मृती बाद झाल्याने भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. त्यानंतर आलेल्या दिप्ती शर्माला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे 7 (12) धावांवरच ती परतली. तसेच सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्ज अर्धशतकापासून दोन धावा दूर असताना सोफिया एकलस्टनची बळी ठरली आहे. तिने 58 चेंडूत 8 चौकार खेचत 48 धावांची खेळी केली आहे. त्यानंतर भारतीय संघाची पडझड सुरू झाली आहे. ठराविक अंतराने हार्लिन देवल 2 (8), मोना मेश्राम 0 (2), तान्या भाटिया 25 (41) बाद झाल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला कर्णधार मिताली राज किल्ला लढवत होती. परंतु, जी. एल्विसने मितालीला 44 (74) धावांवर असताना पायचित करत भारताला सातवा धक्का दिला आहे. त्यावेळी भारताची धावसंख्या 41.1 षटकांत 7 बाद 165 धावा अशी होती.

पुढे शिखा पांडे 11 (22) आणि एकता बिश्त 0 (1) पाठोपाठ धावबाद झाल्या. अनुभवी झुलन गोस्वामीने 37 चेंडूत 30 धावंची भर घातली त्यामुळे भारतीय संघाने 200 चा टप्पा गाठला. 49.4 षटकात झुलन झेलबाद झाल्याने भारताचा डाव 202 धावांवर गुंडाळला आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरूद्ध एकदिवसीय मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मिताली राज आणि कंपनी यजमान इंग्लडला नमवण्याच्या तयारीत आहे. दोन्ही संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे.