‘राघोबादादा जरा आनंदी बाईला आवरा’, महिला शिवसैनिक अमृता फडणवीसांवर ‘आक्रमक’ !

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पिंपरीत महिला शिवसैनिकांनी आक्रमक होत अमृता फडणवीस यांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन केले.
फक्त ‘ठाकरे’ आडनाव असून सुद्धा कोणी ‘ठाकरे’ होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन प्रामाणिकपणे काम करावं लागतं अशी थेट टीका त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली. या टीकेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली.

अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ पिंपरी शहर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी अमृता फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत पिंपरी चौकात तीव्र आंदोलन केले. यावेळी ‘राघोबादादा जरा आनंदी बाईला आवरा’ अशा घोषणा देत महिलांनी अमृता फडणवीस यांचा निषेध केला.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या या ट्विटनंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी ट्विटरवर प्रत्युत्तर दिले. इतिहास रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचा उल्लेख आहे. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो, अशा शब्दात ट्विटरद्वारे नगरसेवक अमोल घोले यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/