महिला शंकराचार्य बनू शकत नाही : स्वामी स्वरूपानंद

मथुरा : वृत्तसंस्था

 

राजकारणासह कोणत्याही इतर क्षेत्रात महिला जाऊ शकतात, मात्र त्या सनातन संस्थेचे प्रतिनिधी असलेले शंकराचार्य बनू शकत नाहीत, असे वक्तव्य द्वारका-शारदापीठ आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले आहे. मथुरेतील वृंदावन येथील उडिया आश्रमातील चातुर्मास कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात अभिनेत्री आणि स्थानिक खासदार हेमा मालिनी सहभागी झाल्यानंतर स्वामी स्वरूपानंद यांनी हे वक्तव्य केले. हेमा मालिनी यांनी स्वामी स्वरूपानंद यांच्या चरणांवर पुष्प अर्पण करून आशीर्वाद घेतले.

[amazon_link asins=’B00KMV9RGA,B01M07FPH6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83ad5c4e-a81b-11e8-8dd7-c57fe8411859′]

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले, अखिल भारतीय विद्वत परिषद या नावाने उभी करण्यात आलेली संस्था बनावट शंकराचार्य तयार करण्याचे काम करत आहे. या संस्थेने काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये पशुपतिनाथाच्या नावाने एक नवे पीठच निर्माण केले. मात्र अशा प्रकारचे कोणतेही पीठ असू शकत नाही, असे स्वामी स्वरूपानंद म्हणाले.

या पीठाने महिलेला शंकराचार्य बनवल्याबाबत स्वामी स्वरूपानंद यांनी आक्षेप नोंदवला. कोणतीही महिला शंकराचार्य पदावर बसू शकत नाही असे खुद्द आदि शंकराचार्यांनीच ठरवले आहे. देशातील महिला पंतप्रधान, राष्ट्रपती, खासदार, आमदार बनू शकतात, मात्र कमीतकमी धर्माचार्यांना तरी सोडा. धर्माचे हे पद महिलांसाठी नाही. आपली राज्यघटना ही आपल्याच देशात लागू होऊ शकते, ती त्याच स्वरुपात दुसर्यां देशात लागू होऊ शकत नाही. त्याच प्रमाणे, कोणालाही शंकराचार्य बनवण्याची व्यवस्था मान्य केली जाणार नाही. शनि मंदिरात महिलांना प्रवेश देण्यामुळे नुकसान होईल असेही ते म्हणाले.

शनि क्रूर ग्रह असल्यामुळे शनि मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात येत नाही. त्याची दृष्टी स्त्रीवर पडली तर तिला नुकसान होऊ शकते. मात्र, समानतेच्या आधारे स्त्रीदेखील शनिची पूजा करू शकते. पण, यामुळे नुकसान होण्यापासून स्त्रीला कोण वाचवणार, असा प्रश्नही स्वामी स्वरूपानंद यांनी विचारला.