कर्ज मंजुर करुन देण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मोटार सायकल खरेदी करण्यासाठी कर्ज मंजुर करुन देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. आत्तापर्य़ंत तीन महिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून आरोपींनी या महिलांची ७ लाख ५० हजार रुपयाची फसवणूक केली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०१७ ते एप्रिल २०१८ या दरम्यान कोंढवा परिसरात घडला.

याप्रकरणी सुफियान रेहमान खान (रा. कोंढवा) याचे विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी तरुणी हे एकाच परिसरात राहत असून ते एकमेकांना ओळखतात. आरोपीने तरुणीला गाडी खरेदी करण्यासाठी कर्ज मंजुर करण्याचे अमिष दाखवले. फिर्य़ादीसह अनेक महिलांना आरोपीने कर्ज मंजूर करुन देण्याचे अमिष दाखवले. महिलांना कर्ज मंजूर करुन देण्यासाठी आरोपी सुरुवातीला लुल्लानगर येथील शोरुमध्ये पाठवत होता. त्या ठिकाणी त्यांचे फॉर्म भरुन घेत होता. काही दिवसांनी महिलांनी फोन करुन कर्जाविषयी विचारणा केल्यानंतर फॉर्म चुकलेला आहे किंवा सही चुकीची आहे असे सांगून तो दुसऱ्या शोरुमध्ये महिलांना पाठवत होता. या ठिकाणी देखील महिलांकडून फॉर्म भरुन घेत होता.

आरोपीने भरलेले फॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळ्या फायनासन्स कडून महिलांच्या नावे कर्ज घेतले. तसेच महिलांच्या नावे सात ते आठ गाड्यांची खरेदी देखील आरोपीने केली आहे. मात्र, खरेदी केलेल्या गाड्या महिलांना मिळाल्या नाहीत. बँकेमधून गाडीचे हप्ते थकल्याचा फोन आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्य लक्षात आले. आरोपीने हे प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी बँकेचे काही हप्ते देखील भरले. आरोपी विरुद्ध आलेल्या तक्रारीवरुन त्याने ७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच शो रुममधून वाहन खरेदी केल्यानंतर वाहन ज्याच्या नावावर आहे त्यांनाच ते दिले जाते. मात्र, या प्रकरणात तसे झाले नसल्याने यामध्ये शोरुमधील कोणाचा सहभाग आहे का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. तसेच अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी कोंढवा पोलिसांकडे संपर्क साधावा असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास एस.पी. शिंदे हे तपास करीत आहेत.