International Woman’s Day 2020 : वीरपत्नी गौरी महाडिक झाल्या ‘लेफ्टनंट’, जाणून घ्या त्यांचा खडतर ‘प्रवास’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चेन्नईमधील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून आपले प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आणि आपल्या हुतात्मा झालेल्या पतीचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची वाटचाल करणाऱ्या लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक याचे प्रेरणादायी शब्द सर्वांनाच प्रेरणा देणारे ठरले. त्या म्हणाल्या की, ‘कुणीही महिला म्हणून स्वत:ला कमजोर समजू नये. तुमच्या मनाला जे वाटते, जे करण्यास वाटते ते तुम्ही आवर्जून करा. विशेष म्हणजे तुमची प्रेरणा तुम्हीच आहात. त्यामुळे दुसरे कुणी तुम्हाला प्रेरणा देईल आणि मग तुम्ही अनुकरण कराल तर याची काही गरज नाही. एकदा स्वत:च्या मनाशी निश्चय केला तर तुम्हाला कुणीच थांबवू शकत नाही, मी देखील तेच केले आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

गौरी महाडिक यांनी बी.कॉम व कायद्याची पदवी घेतली आहे. तसेच या बरोबरच त्यांनी सेक्रेटरीसारखा अवघड अभ्यासक्रम देखील उत्तीर्ण केला आहे. गौरी यांचा २०१५ साली विरारच्या प्रसाद महाडिक यांच्याशी विवाह झाला. मेजर प्रसाद महाडिक हे लष्कराच्या ‘७ बिहार’ या तुकडीत अरुणाचल प्रदेशच्या चीन सीमेवर तैनात असताना त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. परंतु अशा परिस्थितीत खचून न जाता गौरी यांनी आपल्या पतीचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले. नंतर गौरी महाडिक यांनी ‘संयुक्त संरक्षण सेवे’ची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात यश संपादन करता आले नाही, परंतु त्यांनी पुन्हा जिद्दीने परीक्षा दिली आणि वयाच्या ३२व्या वर्षी त्या १६ जणींमधून प्रथम आल्या. नंतर चेन्नईत १ एप्रिल २०१९ रोजी त्यांचे प्रशिक्षण सुरु झाले आणि ७ मार्च २०२० रोजी हे खडतर प्रशिक्षण संपवून त्या लष्करात लेफ्टनंट म्हणू रुजू झाल्या.

दरम्यान त्यांच्या दीक्षांत संचलनानंतर एका वृत्तपत्राकडून त्यांनी अभिनंदनाचा स्वीकार करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचे आई-वडील देखील या कौतुकास्पद सोहळ्यास उपस्थित होते. गौरी महाडिक म्हणाल्या की, ‘प्रशिक्षणादरम्यान माझ्याबरोबरचे सर्व छात्र हे २१ ते २५ वयोगटातले होते. त्यांच्यासोबत कसरती करताना शारीरिक क्षमतेचा पूर्णपणे कस लागायचा. पण सरावाने सगळ्या गोष्टी घडून आल्या आणि स्वतःला सिद्ध करता आले. पाठीवर १५ किलोचे वजन घेऊन ३० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत मला ब्राँझपदक देखील मिळाले.’ तसेच लेफ्टनंट गौरी म्हणाल्या की, आजचा माझा गणवेश हा आमचा, माझा आणि प्रसाद यांचा गणवेश आहे. एका बाजूला पतीचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा आनंद तर दुसरीकडे पतीला गमावल्याचे दु:ख अशा भावना मनात दाटल्या आहेत. आता पतीचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य तितकी मेहनत करेन,’ असे देखील त्यांनी स्पष्ट केले.